घरट्रेंडिंगहे अजब आहे! मोठ्या पोटाने वाचवला त्याचा जीव!

हे अजब आहे! मोठ्या पोटाने वाचवला त्याचा जीव!

Subscribe

तुमचं पोट वाढलं असेल, तर सामान्यपणे डॉक्टर किंवा फिजिशियन ते कमी करण्याचा सल्ला देतात. पोट वाढल्यामुळे त्याचा विपरित परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे वाढलेलं पोट नकोच, अशीच काहीशी समान्य समजूत आहे. पण चीनमध्ये अशी एक घटना घडली आहे की ज्यामध्ये एका व्यक्तीचं पोट वाढलेलं असल्यामुळेच त्याचा जीव वाचला आहे. यावर विश्वास बसणं तसं कठीण असलं, तरी हे खरं आहे. ही घटना चीनच्या लुयांग भागात घडली आहे. एका व्यक्तीला तिथल्या बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर वाचवलं. ‘फक्त पोट वाढलेलं असल्यामुळेच ही व्यक्ती वाचू शकली आहे’, असं स्पष्टीकरण तिथल्या बचाव पथकाने दिलं आहे. पण असं झालं काय होतं?

तर त्याचं झालं असं की…

सदर व्यक्तीच्या घराच्या अंगणात एक बोरिंग आहे. ही बोरिंग काही वर्षांपूर्वी कोरडी पडल्यामुळे या व्यक्तीच्या घरच्यांनी ती लाकडी झाकणं बसवून बंद केली होती. पण काही दिवसांपूर्वी हे झाकण तुटलं आणि बोरिंगचा खड्डा उघडा पडला. ती पुन्हा बंद करण्याचं काम देखील या कुटुंबानं सुरू केलं होतं. पण त्यातच सदर व्यक्ती या खड्ड्याच्या भोवती गेली आणि चुकून तिचा पाय बोरिंगवर तात्पुरत्या स्वरूपात ठेवलेल्या कमकुवक लाकडी फळीवर पडला. सामान्य परिस्थितीत या फळीनं देखील हा आघात सहन केला असता. पण या व्यक्तीचं वजन तब्बल ५०० पौंड म्हणजे जवळपास २३० किलो इतकं होतं. त्यामुळे हा भार त्या फळीला सहन झाला नाही आणि ती तुटली!

- Advertisement -

महाशय थेट बोरिंगच्या खड्ड्यावर!

धष्टपुष्ट शरीययष्टीची ही व्यक्ती खड्ड्यामध्ये पडली खरी. पण ती मध्येच अडकून राहिली. पार कंबरेपर्यंत खड्ड्यात गेली. पण तिथून पुढे काही जाऊ शकली नाही. खाली बोरिंग बरेच फूट खोल होती. पण बोरिंगचं तोंड अरूंद असल्यामुळे आणि या व्यक्तीचं पोट ऐसपैस असल्यामुळे त्या अरुंग तोंडातून पोट जाऊ शकलं नाही. झालं. कंबरेपर्यंतच शरीर खड्ड्यात अडकलेल्या अवस्थेत ही व्यक्ती अडकून पडली. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे येऊन प्रयत्नपूर्वक या व्यक्तीला बाहेर काढलं!

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर व्यक्ती खड्ड्यात कंबरेपर्यंत खाली गेलेली आणि हाताची घडी घालून आपल्याला बाहेर काढलं जाण्याची वाट पाहात असलेली दिसत आहे. एकंदरीतच त्यांच्या जिवावर बेतलेला हा प्रसंग पोटामुळे फक्त कंबरेपर्यंत अडकण्यावरच निभावला म्हणून बरं. त्यामुळे वाढलेल्या पोटाचे तोटे जरी असले, तरी काही फायदे नक्कीच आहेत मंडळी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -