न भूतो, न भविष्यती! २ हजार वर्षांपूर्वी मेलेल्या माणसाच्या मेंदूतल्या जिवंत पेशी सापडल्या!

brain cells 2 photo curtesy - Pier Paolo Petrone
हा तरूण राजा ऑगस्टसचा रखवालदार असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. (फोटोमध्ये उजवीकडे राजा ऑगस्टस)

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलंय. आजपर्यंत जगभरातल्या पुरातत्व संशोधकांनी अनेक प्रकारची संशोधनं केली. त्यामधून जगाच्या इतिहासाचे अनेक पैलू नव्यानं उलगडून दाखवले. पण आता आजपर्यंत कधीही न शोधण्यात आलेले घटक संशोधकांना सापडले असून यातून २ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर कशा प्रकारची मानवी वस्ती होती, कशी संस्कृती होती, माणूस कशा पद्धतीने विचार करत होता, त्याची विचारसरणी कशी होती या बाबतीत उलगडा होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल या अनुषंगाने टाकलं गेलं आहे. कारण पुरातत्व संशोधकांना तब्बल २ हजार वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका २० ते २५ वयाच्या तरूणाच्या मेंदूतल्या जिवंत पेशी सापडल्या आहेत. या पेशींमध्ये अजूनही म्हणजेच २ हजार वर्षांनंतर देखील जिवंत न्यूरॉन्स आहेत. हा रिसर्च ‘प्लॉस वन’ या आंतरराष्ट्रीय इतिहास संशोधनासंबंधीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

brain cells photo curtesy - Pier Paolo Petrone

हा मेंदू नक्की आहे तरी कुणाचा?

इटलीच्या पॉम्पे शहराजवळच हरक्युलेनियम नावाचं एक शहर २ हजार वर्षांपूर्वी म्हणजेच इसवीसन ७९ मध्ये अस्तित्वात होतं. इथे ऑगस्टस नावाच्या राजाचं राज्य होतं. तिथले नागरिक ऑगस्टसला देव म्हणून पूजत असत. पण जगाच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेलेला कुप्रसिद्ध माऊंट वेसूविअस (Mount Vesuvius) चा लाव्हा उद्रेक झाला आणि हे आख्खं शहर त्या उद्रेकामध्ये सामावलं गेलं. याच उद्रेकाचा लाव्हा थंड झाल्यानंतर त्यातून माऊंट वेसूविअस हा लाव्हा पर्वत तयार झाला.

brain cells photo curtesy 1 - Pier Paolo Petrone
२ हजार वर्षांपूर्वी मरण पावलेल्या त्या तरुणाच्या मेंदूचे हे अवशेष

तो ऑगस्टसचा रखवालदार होता?

हा लाव्हा उद्रेक झाला तेव्हा तिथलं तापमान तब्बल ५२० डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड होतं. पण जितक्या वेगाने ते वाढलं, तितक्याच वेगाने सगळं थंड देखील झालं आणि आख्खं शहर त्या महाकाय पर्वताखाली दबलं गेलं. या ठिकाणी संशोधन करणाऱ्या इटलीच्या फेडरिको विद्यापीठाचे संशोधक पिअर पाओलो पॅट्रोन यांच्यामते मृत्यू झालेला तरुण हा उद्रेक झाला तेव्हा उलटा झोपला होता. त्यामुळे त्याचा चेहरा खालच्या बाजूला होता. तो ऑगस्टसचा सेवक आणि त्या इमारतीची रखवाली करणारा रखवालदार असावा.

…म्हणून पेशी जिवंत राहिल्या!

सामान्यपणे अशा प्रकारच्या लाव्हा उद्रेकांमध्ये इतक्या अतिप्रचंड तापमानात सापडणाऱ्या व्यक्तींच्या पूर्ण मृतदेहाची काही क्षणांत राख होते. त्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रकारचे अवशेष शिल्लक राहात नाहीत. मात्र, माऊंट वेसूविअसचा लाव्हा उद्रेक झाल्यानंतर तो वेगाने थंड झाला. त्यामुळे त्याखाली दबून मृत्यू झालेल्या या तरुणाचे अवशेष तिथल्या थंड झालेल्या तापमानामुळे जसेच जतन झाले. ही एक अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं देखील पिअर पाओले पॅट्रोन यांचं म्हणणं आहे! या शोधानंतर आता तरुणाच्या मेंदूच्या अवशेषांच्या माध्यमातून तत्कालीन मानवी देहाची किंवा मेंदूची संरचना यांचा देखील अभ्यास करता येणार असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.