फी भरायला पैसे नाहीत, मग नारळ द्या; बालीच्या कॉलेजची अनोखी शक्कल

Bali college Tuition fees Coconuts
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी अर्थव्यवस्थेला खीळ बसली. पर्यटनावर अवलंबून असलेल्या देशातील अर्थव्यवस्थेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. अनेकांना शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव करणे अशक्य झाले. अशातच बाली मधील एका हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजने यावर अनोखा तोडगा काढला आहे. ज्या विद्यार्थ्यांना फी भरण्यास अडचण येत आहे. त्यांनी नारळ देऊ शकता, अशी मुभा बालीतल्या व्हिनस टुरिझम अॅकडमीने दिली आहे.

कॉलेजचे अधिकारी वायन पासेक आदी पुत्र यांनी बालीतील स्थानिक वृत्तपत्र बाली पुस्पा न्यूजशी बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी दिलेल्या नारळाचा वापर आम्ही कच्चे तेल काढण्यासाठी करणार आहोत. जे आमच्या शाळेतच वापरले जाते. आम्ही सुरुवातीला हप्त्यांनी फी भरण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आम्ही त्यात आणखी शिथीलता आणली. कोविडमुळे आधीच अर्थव्यवस्था खालावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फीच्या बदल्यात नारळ देण्यास सांगितले आहे.”

बाली सन या दुसऱ्या एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार या कॉलेजने नारळासहीत इतरही नैसर्गिक पिके स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. moringa leaves आणि Gotu kola leaves ही पिके देखील कॉलेजकडून स्वीकारली जात आहेत. त्यापासून हर्बल साबण तयार करण्यात येत आहे.