Lockdown Effect: कोरोनाच्या भीतीमुळं पत्नीचा नांदायला नकार; पतीची पोलिसांत तक्रार

bride refused to husband
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना व्हायरसने संपुर्ण विश्वाला लॉकडाऊन केलं आहे. या काळात माणूस जगण्याची, जीव वाचविण्याची धडपड करताना दिसतोय. कोरोनामुळं अनेक नाती जवळ आली आहेत, तर काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. मध्य प्रदेशच्या संभळमध्ये अशीच एक वेगळी घटना घडली आहे. कोरोनाच्या भीतीमुळं नवीन लग्न झालेल्या नवरीने पतीच्या घरी जायला नकार दिला. जोपर्यंत कोरोना संपत नाही, तोपर्यंत मी नांदायला येणार नाही, असे तिने स्पष्ट सांगून टाकले. पतीला मात्र पत्नीचे हे वागणं कारी रुचलं नाही आणि त्याने पोलिसांत तक्रार दिली.

संभळमधील एका युवकाचे सहा महिन्यापूर्वी अमरोहा येथील युवतीशी झाले होते. दोन महिन्यांपूर्वी पत्नी आपल्या माहेरी गेली होती. आता पतीने पत्नीला घरी बोलावलं. मात्र ती काही केल्या सासरी यायला तयार नाही. पतीने जेव्हा फोन करुन तिला यायला सांगितले, तेव्हा तिने लॉकडाऊन आणि पोलिसांची भीती वाटते सांगून उडवून लावले. त्यानंतर पतीने मी पास बनवून तुला घ्यायला येतो असे सांगितले. त्यावर पत्नीने जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत मी येत नाही, असे सांगून टाकले.

पत्नीच्या या निर्णयामुळे संतापलेल्या पतीने थेट सासू-सासऱ्यांकडे तक्रार केली. मात्र सासू-सासऱ्यांनीही आपल्या मुलीची बाजू उचलून धरत मुलीला सासरी पाठविणार नसल्याचे सांगून टाकले. आता मात्र पतीचा तिळपापड झाला. रागाच्या भरात त्याने स्थानिक पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. आपली आई वृद्ध असून घरात जेवण बनविण्यासाठी कुणीच नाही. त्यामुळे मला पत्नीला घरी परत आणण्यासाठी मदत करा, अशी विनंती केली. मात्र पोलिसांनीही त्याला नकारघंटाच दाखवली.

कोरोनाच्या भीतीमुळं केवळ हे एकच प्रकरण नाही. देशातल्या अनेक राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यात अशाप्रकराचे किस्से घडले आहेत. कुणाची पत्नी दुसरीकडे राहिली आहे, तर कुणाचे मुले किंवा पालक. सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांनी कसेबसे दिवस ढकलले. मात्र पुन्हा १९ दिवसांचा लॉकडाऊन लागल्यानंतर अनेकांचा धीर सुटला आहे. त्यामुळे लोक लॉकडाऊनचे नियम तोडून आपापल्या घरी निघाले आहेत तर काही जण आहे त्याच ठिकाणी कुंठत बसले आहेत.