कोरोनाच्या बचावासाठी ‘या’ देशात सॅनिटायझर नाही तर परफ्युमचा होतोय वापर!

कोरोनाशी लढण्यासाठी हा परफ्युम जास्त प्रभावी असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनाचा हा परफ्युम भाग बनला आहे

कोरोनाच्या बचावासाठी 'या' देशात सॅनिटायझर नाही तर परफ्युमचा होतोय वापर

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून जरी घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात असले तरी प्रत्येक जण वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करताना दिसतोय. यासोबत वारंवार हात स्वच्छ धुणे, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, मास्क लावणे तसेच सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात लोकं करताना दिसताय. मात्र एक देश असा आहे, जिथं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी परफ्युमचा वापर केला जात आहे.

तुर्कीमध्ये कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परफ्युमचा वापर होत आहे. ज्याला स्थानिक भाषेत कोलोन्या (kolonya) असे म्हटले जाते. खरंतर हा परफ्युम असा आहे ज्याचा सुगंधात एसेंशियल ऑइलचं प्रमाण खूप कमी असते, तर अल्कोहोलचे प्रमाण जास्त असून या परफ्युमला तुर्कीच्या संस्कृतीचा एक भाग असल्याचे संबोधले जाते.

कलोन परफ्युमचा असा केला जातो वापर

तुर्कीमध्ये जेवणापूर्वी पाहुण्यांच्या हातावर सर्वात आधी कलोन शिंपडले जाते. स्वच्छेत अव्वल असलेल्या तुर्कीमध्ये सॅनिटायझर म्हणूनही याचा वापर केला जातो. या परफ्युममुळे साधारण ८० टक्के जंतूंचा नाश होतो, असे मानले जाते. कोरोनाशी लढण्यासाठी हा परफ्युम जास्त प्रभावी असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनाचा हा परफ्युम भाग आहे.

या परफ्युमचा उल्लेख तुर्की मीडियानेही anti-covid-19 परफ्युम असा केला आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार वाढल्यानंतर या परफ्युमच्या विक्रीतही वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यात या परफ्युमची ऑनलाईन विक्री देखील वाढली आहे. कोरोनाशी लढण्याचं शस्त्र म्हणून या परफ्युमचा वापर सर्वाधिक केला जात आहे. तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी याचे फायदे सांगत हा परफ्युम वारण्याचे आदेश तेथील नागरिकांना दिले आहेत.

तसेच देशातल्या सर्व नागरिकांना हा परफ्युम मिळावा यासाठी सरकारनेही मोठी पावलं उचलली असून १३ मार्चला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं बंद केलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कलोन तयार होइल.