महागाईतही खापराच्या पुरणपोळ्यांचा गोडवा टिकून

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मांड्यांची अधिक क्रेझ

प्रमोद उगले ,नाशिक

महाराष्ट्रवासियांच्या खास पसंतीस उतरणारे मराठमोळा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. त्याला मांडे म्हणूनही ओळखले जाते. प्रत्येेक सणाला नैवेद्य पदार्थांमध्ये पुरणपोळीचा आवर्जून समावेश केला जातो. याच पुरणपोळींचा गोडवा यंदा महागाईच्या काळातही टिकून असल्याचे चित्र आहे. खास शैलीत हे मांडे तयार केले जात असल्याने अनेकांना ते घरी तयार करणे शक्य होत नाही, परिणामी, किंमतीत वाढ होऊनही खवैय्यांकडून रेडिमेड मांड्यांना मागणी असल्याचे दिसून येते.

खेडेगावात मातीच्या खापरावर पुरणपोळ्या बनवल्या जातात. उत्तम प्रकारच्या पुरणपोळ्या तयार करण्यासाठी चुलीचा आणि त्यावर मातीच्या खापरीचा वापर केला जातो. खेड्यांमध्ये मांड्या करणे सोपे जाते, परंतु शहरात आजही अनेकांना मांडे तयार करणे अवघड वाटते. तव्यावर केलेल्या पूरणपोळीपेक्षा खापरावरची पोळी खायला अधिक स्वादिष्ठ्य असल्याने शहरी भागात खपरावरच्या पुरणपोळ्या तयार करून घेण्यावर भर दिला जातो. आंब्यांचा सीझन येताच पुरणाच्या पोळ्यांना अधिक मागणी वाढते. यामुळेच आजघडीला नाशिक शहरात नवीन गृहउद्योगांना चालना मिळतेय. महिलांचे छोटे समूहही पुरणपोळ्या करून विकतात, यामुळे त्यांच्या घरतील खर्चात हातभार लागतो.

असे बनवले जातात मांडे 

मांड्यांसाठी विशिष्ट प्रकारचे गहू स्वच्छ धुणे, त्यानंतर ते वाळवणे, जात्यावर किंवा गिरणीत दळणे, पातळ कापडाने हे पीठ गाळल्यानंतर यातून तयार झालेल्या पिठाची कणिक करून कणकेच्या योग्य आकारमानाच्या पोळ्या लाटून त्यात शिजवलेली हरभरा डाळ व गुळ एकत्र करून टाकतात. त्यानंतर मोठ्या मेहनतीसह कौशल्याने खापरावर हे मांडे बनविले जातात.

मागील काही वर्षांतील पुरणपोळ्यांच्या किमती

  • २०१९ : २० ते २५ रु. प्रती नग
  • २०२० : ३० ते ४५ रु. प्रती नग
  • २०२१ : ४५ ते ५५ रु. प्रती नग
  • २०२२ : ८० ते १०० रु. प्रती नग

 

आर्थिकदृष्ठ्या पुरणपोळीचा व्यवसाय चालवणे परवडत नाही. तरी जनतेच्या आग्रहापोटी आम्ही हा व्यवसाय चालवत आहोत. यावर्षी किराणा मालाचे भाव वाढल्याने नाईलाजास्तव २० ते ३० टक्क्यांनी भाववाढ करावी लागली.

– लता वाघ, पुरणपोळी विक्रेते

तव्यावरील पोळीपेक्षा खापराची पोळी खायला स्वादिष्ट असते. त्याचबरोबर ती चुलीवर बनवली असल्याने तिच्यातील पोषक तत्व टिकून राहतात. त्यामुळे आम्ही खापरीवरच्या पुरणपोळ्या घेण्यास पसंती देतो. त्या सर्वांना आवडतातही..!

– शैला आलुते, गृहिणी