‘eBay इंडिया’ घेणार युजर्सचा निरोप

'eBay इंडिया' च्या जागी आता कोणती नवीन वेबसाईट येणार ? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल

Flipkart to close eBay in India
सौजन्य- Entrackr

ऑनलाईन शॉपिंगमध्ये अग्रेसर असलेली एक कंपनी म्हणजे ‘ईबे-इंडिया’. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनपाठोपाठ भारतीय ग्राहकांची ईबे-इंडियाला वेबसाईटलाही तितकीच पसंती मिळाली आहे. मात्र, आता लवकरच ईबे-इंडिया ही वेबसाईट बंद होणार आहे. मागील वर्षी ईबे इंडिया कंपनीने फ्लिपकार्ट कंपनीसोबत एकत्र येत ऑनलाईन विक्रीचा एक करार केला होता. वर्षभरानंतर आता हा करार संपुष्टात येणार असल्यामुळे ई-बे इंडिया वेबसाईट लवकरच ग्राहकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान फ्लिपकार्ट ऑनलाईन शॉपिंगसाठी आता ई-बे इंडियाच्या जागी अशीच एक नवीन वेबसाईट लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फ्लिपकार्ट आणि ईबे इंडियाच्या करारनुसार ईबे वेबसाईटवर वापरलेल्या (सेकंड हँड) तसंच दुरुस्त केलेल्या वस्तू सर्वाधिक विकल्या जात असत. यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून तब्बस १.४ अब्ज डॉलर्सची (साधारण ९ हजार ३० करोड रुपये) उभारणी केली होती. यामध्ये टॅनसेंट, मायक्रोसॉफ्ट आणि ईबे-ग्लोबल या कंपन्यांचीही भागीदारी होती. फ्लिपकार्ट कंपनीचे सीईओ कल्याण कृष्णमुर्ती यांनी ‘ईबे-इंडिया’ बंद होणार असल्याची माहिती ईबेच्या कर्मचाऱ्यंना ई-मेलद्वारे दिली असल्याचं समजत आहे. दरम्यान याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी सध्या मार्केटमध्ये सुरु असलेल्या चर्चेनुसार ईबे-इंडिया हे वेब पोर्टल, येत्या १४ ऑगस्टपासून बंद होणार आहे. त्यामुळे साईटवरील सर्व प्रॉडक्ट्सची लिस्टींग ही ३१ जुलैपर्यंतच अबाधित राहणार आहे.