VIDEO: लेडी गागाला कडेवर घेऊन चाहता स्टेजवरून कोसळला, गागाचे चाहते हळहळले!

Lady Gaga Accident

स्टेफनी जोएन्ना अँजेलिना जर्मेनोटा अर्थात लेडी गागा हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेडी गागाच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ती गाणं सादर करत असतानाच एक चाहता थेट स्टेजवर चढला आणि त्यानं चक्क लेडी गागाला उचलून घेतलं. बरं हा चाहता फक्त तिला उचलूनच थांबला नाही, तर तो चक्क तिला उचलून नाचायला लागला. यावर लेडी गागा काही बोलणार आणि तिचे सुरक्षारक्षक स्टेजवर येऊन या ‘बिन बुलाये मेहमान’ला बाजूला करणार, इतक्यात हा पठ्ठ्या लेडी गागाला कडेवर घेऊन थेट स्टेजवरून खालीच कोसळला. हा व्हिडिओ ज्या चाहत्याने काढला, त्याला देखील आपल्याला ही घटना कॅमेऱ्यात कैद करता आली, यावर विश्वास बसत नव्हता.

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर लागलीच गागाचे सुरक्षारक्षक आणि व्यवस्थापन पथकातील सदस्य तिच्या मदतीसाठी धावले. या अपघातामुळे लेडी गागाला कितपत दुखापत झाली आहे, याविषयी अद्याप काहीही कळू शकलेलं नाही. मात्र, दृश्यांवरून तरी तिला फारशी दुखापत झाली नसावी, असंच दिसत आहे.

या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लेडी गागाच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.