लॉकडाऊन, कोरोनाशी संबंध नाही, पण तरी वैतागलेल्या तरुणाने फेसबुकवर स्वत:लाच काढले विक्रीला

फेसबूकवर तरूणाने स्वतःची केली जाहीरात

जगभरासह देशात कित्येक महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही ठिकाणी लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे सगळे घरात असून घरून आपले कामं करत आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर या काळात घटस्फोटोचे प्रमाण देखील वाढले. लॉकडाऊनमध्ये काहींना मानसिक आजार झाले तर काही जण नैराश्यात देखील गेल्याचे पाहायला मिळाले. पण याच दरम्यान एका तरुणाने एकाकीपणाला कंटाळून केलेला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा लॉकडाऊन, कोरोनाशी काहीही संबंध नाही आहे. तर हा ३० वर्षीय तरुण गेल्या १० वर्षांपासून एकाकी जीवन जगत आहे. दहा वर्षात एकाही रिलेशनमध्ये राहू न शकल्याने या तरुणाचे जीवन एकाकीपणामुळे कंटाळवाणे बनले होते. त्यामुळे आपल्या जीवनातील एकाकीपणाला कंटाळून या तरुणाने चक्क स्वत: लाच विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला.

…म्हणून तरूणाने घेतला निर्णय

जीवनातील एकाकीपणाला कंटाळून या तरुणाने चक्क स्वत: लाच विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला. तसेच स्वत:चा फेसबूकवर सेलसुद्धा लावला. सर्वात गमतीदार बाब म्हणजे या तरुणाने या सेलमध्ये स्वत:ची किंमत आणि अटीशर्तींचासुद्धा उल्लेख केला आहे. आता या तरुणाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली असून, लोकांकडून त्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. मात्र या पोस्टमुळे आपल्या जीवनात पुन्हा चैतन्य येईल असा या तरुणाला विश्वास आहे.

ऑनलाइन प्रेमाच्या शोधात आहे तरूण

अ‍ॅलन क्लेटॉन असे या स्वत:लाच विक्रीला काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या १० वर्षांपासून एकाकी आहे. त्याने अनेक डेटिंग अ‍ॅप वापरले मात्र त्याला कुणी पार्टनर मिळाली नाही. त्यानंतर त्याने स्वत:लाच विक्रीला लावण्याचा निर्णय घेतला. यूकेचा रहिवासी असलेला अ‍ॅलन पेशाने लॉरी ड्रायव्हर आहे. त्याने स्वत:चा फ्री आणि वापरण्यासाठी चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचा उल्लेख केला आहे. एकाकीपणाला वैतागलेला हा तरुण ऑनलाइन प्रेमाच्या शोधात आहे. दरम्यान, स्वत:चा सेल लावल्यानंतर त्याच्याकडे मुलींच्या ऑफर्सची रांग लागली आहे. आता आपल्या जीवनातील एकाकीपणा संपुष्टात येईल, अशी त्याला आशा आहे.

फेसबूकवर तरूणाने स्वतःची केली जाहीरात

आपल्या जाहिरातीमध्ये अ‍ॅलन म्हणतो की, महिलांनो मी अ‍ॅलन ३० वर्षांचा आहे. मी एका प्रेमळ महिलेच्या शोधात आहे. जिच्यासोबत मी बोलू शकेन आणि जिच्यासोबत मी काही सोहळ्यांमध्ये जाऊ शकेन. तिथे मी एकटा जाऊ इच्छित नाही. दरम्यान, स्वत:च्या विक्रीची जाहिरात दिल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याच्या पोस्टवर अनेक मुलींनी त्याच्यासोबत डेटवर जाण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे.