Taj Mahal : पत्नीला गिफ्ट केला हुबेहुब ताजमहाल, पतीची तीन वर्षांची तपश्चर्या

MP man gifts Taj Mahal-like home to wife, replica took three years to build
Taj Mahal : पत्नीला गिफ्ट केला हुबेहुब ताजमहाल, पतीची तीन वर्षांची तपश्चर्या

ताजमहाल हे निखळ प्रेमाचे प्रतीक आहे. या प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालची प्रतिकृती भेट दिली जाते. परंतु केवळ मुघल सम्राट शाहजहाननेच पत्नीला प्रेमाची भेट दिली नाही तर जगात असे अनेक लोक आहे. जे आजही आपल्या प्रेमाला दररोज नव्याने जगण्याचा आणि कबुल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे घडली आहे. जिथे एका पतीने आपल्या पत्नीला भेट म्हणून हुबेहुब ताजमहालप्रमाणे बांधलेले घर दिले आहे. ज्याला बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या घरात चार बेडरूम, एक मोठा हॉल, एक किचन, लायब्ररी, मेडिटेशन रुम आहे. या आलिशान ताजमहाल प्रमाणे दिसणाऱ्या घराचे क्षेत्रफळ ९० बाय ९० चौरस मीटर इतके आहे.

पत्नीला भेट म्हणून दिले प्रेमाचे प्रतीक

हुबेहुब ताजमहालासारखे दिसणारे हे घर मध्य प्रदेशचे शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी बनवले आहे. त्यांनी सांगितले की, पूर्वी ताजमहाल ताप्ती नदीच्या काठावर बांधला जाणार होता, मात्र काही कारणास्तव तो आग्रा येथे बांधला गेला. जेव्हा ते ताजमहाल पाहायला गेले तेव्हा त्यांना हा ताजमहाल मध्य प्रदेशात का बांधला नाही याची खंत होती. यावेळी त्यांनी आपले प्रेम पत्नी मंजुषा चौकसे हिला ताजमहालसारखे घर भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. ताजमहालासारखे घर बांधताना चौकसे यांना अनेक अडचणी आल्या. मात्र आनंद चौकसे यांनी अतूट प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आणि  तंत्रज्ञानाच्या मदतीने ताजमहालाप्रमाणे दिसणारे घर यशस्वीरित्या तयार केले आहे. या अवघड घराचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली, असे घर बांधणारे अभियंता प्रवीण चौकसे सांगतात.

आलिशान घराची खासियत काय आहे?

ताजमहालासारखे दिसणाऱ्या या घराचे क्षेत्रफळ ९० बाय ९० चौरस मीटर इतके आहे. अभियंता प्रवीण चौकसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घराची उंची २९ फूट ठेवण्यात आली आहे. यामध्ये ताजमहालसारख्या टॉवरची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली आहे. याशिवाय घराची फरशी राजस्थानच्या मकराना येथील कामगिरांकडून बनवण्यात आली आहे. घरातील नक्षीकाम हे बंगाल आणि इंदूर येथील कारागिरांनी केले आहे. तर फर्निचर सुरत आणि मुंबईतील कारागिरांनी बनवले आहे. या घरात एक मोठा हॉल, खाली दोन बेडरूम आणि वरच्या मजल्यावर फक्त दोन बेडरूम आहेत. या घराला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांसाठी हे घर आता आकर्षणाचा विषय ठरले आहे.