यात्रेच्या आठवणी : “बायस्कोप’च्या पेटार्‍यातील पिक्चर”

नाशिक : छोटेखानी रंगीबेरंगी पेटारा.. त्यावर छानशा फुलांची नक्षी.. साखळीला लावलेली डब्ब्यांसारखी झाकणं.. ती खोलण्यासाठी पाच पैसे मोजावे लागायचे. पण एकदा ती खोलली आणि त्यात डोकवून बघितलं की, ताजमहाल, लाल किल्ला, चार मिनार, गेट वे ऑफ इंडिया, कुतुब मिनार यांसारख्या वास्तुंचे दर्शन व्हायचे.. इतकेच नाही तर हिमालय पर्वताची सफरही या छोट्याशा बॉक्समधून व्हायची.. साधारणत: १९७० च्या दशकात प्रत्येक गावाच्या यात्रेत प्रतिष्ठा मिळवलेला ‘बायोस्कोप’ आज काळात जमा झाला आहे. असे असले तरी त्याच्या आठवणी मात्र त्याकाळातील प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत.

‘देखो देखो देखो बायस्कोप देखो& घोडे पे बनके सवार देखो.. कलकत्ते का चौरागी बाजार, घर बैठे सारा संसार देखो.. पैसा फेको तमाशा देखो..’ १९७२ साली प्रदर्शित झालेल्या दुश्मन चित्रपटातील बायस्कोपवरील हे गाणे चांगलेच गाजले होते. कारण तोपर्यंत यात्रेत येणार्‍या बायोस्कोपने प्रत्येकाच्या मनात गारुड केले होते. त्याकाळी टिव्ही फारसा प्रचलित नव्हता.. चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बघण्याइतकी चांगली आर्थिक परिस्थिती फारशी कुणाची नसायची.. त्यामुळे बच्चे कंपनी बायोस्कोपलाच चित्रपट समजून त्याची मजा लुटत. म्हणूनच बायोस्कोप हा चित्रपटाच्या समृद्ध संस्कृतीचा एक भाग बनला. प्रत्येक गावाच्या यात्रेत बायोस्कोपवाला दिसायचा. तो एकतर राजस्थानी असायचा किंवा यूपी, बिहारी भैया. बायोस्कोपचा छोटाचा पेटारा डोक्यावर घेऊन तो ‘ए पिक्चर देखो.. पाच पैसे में पिक्चर देखो..’ अशी आरोळी द्यायचा. या आरोळीची कमाल इतकी असायची की काही क्षणात बच्चे कंपनी रांग लावून पिक्चर बघण्यासाठी उभी दिसायची.

बायस्कोपची रचना अशी असायची की आतील चित्र पुढे सरकण्यासाठी वरच्या बाजूला लोखंडी एल आकाराची पट्टी असायची. ती जात्यासारखी फिरवली की आतली चित्र पुढे सरकायची. काही बायस्कोपना छोटासा ग्रामोफोन असे. छोटी तबकडी लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकावे लागे. असे एखादे गाणे लांबून जवळ – जवळ येऊ लागले की समजावे बायस्कोपवाला आला. आज पाच पैसे चलनात नसले तरी त्या काळात या पाच पैशाला किंमत होती. कारण एक पैसा, दोन पैसे अशी नाणी चलनात होती. या बायोस्कोपमध्ये काय पाहायला मिळायचे? तर मोजून पाच स्लाईडस. स्थिर चित्र. फिल्मचा एक तुकडा. पण या पाच स्लाईडस एक प्रकारची उर्जा देत. अगदी लहान वयात त्या स्लाईडसवरचे चेहरे ओळखता येत नसत. फक्त समाधान इतकेच असायचे की, ‘एक प्रकारचा चित्रपट पहिला’.. बघणार्‍याचा चेहरा खुलून जायचा आणि चिमुरड्यांच्या आनंदात पिताही हरखून जायचा.

टिव्हीने केले महत्व कमी

१९६० च्या दशकात बायस्कोपचा जन्म झाला. त्यानंतर १९७० च्या दशकात गावा-खेड्यांतील यात्रेत बायस्कोपने आपले पाय रोवले. १९ ८० च्या दशकापर्यंत त्याचा भाव टिकून होता. परंतु घराघरात टिव्ही आले तेव्हापासून बायस्कोपचे महत्वही कमी झाले. सुरुवातीला ग्रामोफोनच्या माध्यमातून बायस्कोपमध्ये गाणे ऐकू येत. त्यानंतर आठ गाण्यांच्या कॅसेटचा वापर होऊ लागला. बायस्कोपमधील चित्रांमध्येही स्थित्यंतरे होत गेलीत. सुरुवातीला भारतातील काही प्रेक्षणीय स्थळांचे चित्र दाखवले जात. त्यानंतर परदेशातील स्थळांनाही यात स्थान मिळाले. शेवटच्या काळात चित्रपटातील फिल्म लावली जात. अमिताभ, धर्मेंद्र, जया प्रदा, हेमा मालिनी, मुमताज यांसारख्या कलाकारांना बघतांना जणू चित्रपट बघितल्याचा आनंद मिळायचा. बायस्कोपच्या अस्ताच्या काळात काही मंडळींनी सिडीचाही वापर केला. आज काही यात्रांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जाणीवपूर्वक बायस्कोप ठेवण्यात येतात. मात्र त्याचे तिकीट साधारणत: ३० रुपयांपर्यंत असते.