पोलीस कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी दिलं हटके कारण; सोशल मीडियावर पत्र व्हायरल

सुट्टीसाठी पोलीस कर्मचाऱ्याने हटके कारण दिले आहे.

पुणे तिथे काय उणे असं सहज म्हटलं जातं. पुणेकरांकडून विविध गोष्टींसाठी दिलेली कारणेही तुफान असतात. तसंच, सुट्टीसाठी पुणेकर काहीही कारणं देऊ शकतात, याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी एक हटके कारण दिलं आहे. सुट्टीसाठी लिहिलेल्या पत्रात नमूद असलेलं कारण जरा विनोदी असल्याने ते पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सुट्टी हवी होती. त्यासाठी त्यांनी रितसर वरिष्ठांना पत्र लिहून सुट्टी मागितली. मात्र, सुट्टीचं कारण ऐकाल तर तुम्हीही हैराण व्हाल.

मूळचे सोलापूरचे असलेले एस.डी शिंदे हे पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना साप्ताहिक सुट्टीला जोडूनच एक सुट्टी हवी होती. सहकाऱ्यासाठी चिलापी आणि रव मासे आणण्यासाठी सोलापूर येथील वाशिंदे या मूळ गावी जाण्यासाठी त्यांनी सुट्टी मागितली. २९ मे रोजी या कर्मचाऱ्याची साप्ताहिक सुट्टी होती. या सुट्टीला जोडूनच ३० मे रोजी त्यांना सुट्टी हवी होती. त्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं.

पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.