कंगना ‘राणी लक्ष्मीबाई’ असेल तर अजय देवगन ‘भगतसिंग’ अन विवेक ‘मोदीजी’ असायला हवेत

prakash raj takes dig at Kangana Ranaut
अभिनेते प्रकाश राज यांनी कंगना राणावतची खिल्ली उडवली

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सुरु असलेल्या शाब्दिक युद्धात आता चित्रपटसृष्टीतील काही कलाकार देखील भाष्य करत आहेत. शिवसेनेसोबतच्या वादात कंगनाने स्वतःच्या मनिकर्णिका चित्रपटाची आठवण करुन देत शिवसेनेवर निशाणा साधला होता. या चित्रपटात तिने राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली होती. या विषयावरुन दक्षिणेतील सुपरस्टार आणि हरहुन्नरी अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनाची खिल्ली उडवणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी जो फोटो वापरला आहे. तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एक चित्रपट केल्यामुळे जर कंगना राणी लक्ष्मीबाई होत असेल तर इतर कलाकारांनी ज्या ज्या महापुरुषांचे चित्रपट केले आहेत. त्या त्या महापुरुषांवरुन त्यांची ओळख होईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये #JustAsking असा हॅशटॅग दिला आहे. तसेच जे मिम शेअर केले आहे. त्यात म्हटले आहे की, जर एक चित्रपट केल्याने कंगना राणी लक्ष्मीबाई होत असेल तर मग दीपिका पदुकोण पद्मावती, ऋतिक रोशन हा अकबर, शाहरुख खान अशोका, अजय देवगन भगतसिंग, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ऑबेरॉय हा मोदीजी होऊ शकतो. प्रकाश राज यांनी शेअर केलेले हे मिम सध्या व्हायरल होत असून कंगनाच्या विरोधकांसाठी हे तर आयतेच कोलीत सापडले आहे.

कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्यानंतर शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली होती. शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगनाला पुन्हा मुंबईत येऊ नको, असे सुचवले होते. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी कंगनाने एक ट्विट केले होते. “आज महाराष्ट्रावर प्रेम दाखवत आहेत. त्या चापलुसांना मी सांगू इच्छिते की, मराठा इतिहासाचा अभिमान असलेल्या शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांना मीच सर्वात आधी मोठ्या पडद्यावर घेऊन आली होती.”