शंभराची नवी नोट लाँच, जुन्या नोटा बंद झाल्याची अफवा

आरबीआयने गुरुवारी १०० रुपयांची नवी नोट लाँच केली. पंरतु त्याच्या एक दिवस अगोदरपासूनच नव्या नोटेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो व्हायरल होत असताना जुनी नोट बंद केल्याच्या अफवादेखील पसरल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिंकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

New 100 rs not
१०० रुपयांची नवी नोट (सौजन्य - इंडिया टीव्ही)

भारतीय रिझर्व्ह बँकेने १०० रुपयांची नवी नोट लाँच केली आहे. या नोटेचा रंग फिक्कट जांभळा आहे. नवी नोट अद्याप लोकांपर्यंत पोहोचली नसली तरी नव्या नोटेचे फोटो इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आहे. अनेकांनी हा फोटो व्हायरल करत असताना जुनी नोट बंद झाल्याची अफवा पसरवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. बुधवारी मानखुर्दमध्ये १०० रुपयांची जुनी नोट बंद झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे अनेक दुकानदारांनी १०० रुपयांची जुनी नोट घेण्यास नकार दिला. नवी नोट लोकांपर्यंत पोहोचलेली नाही शिवाय दुकारनदारांकडे पाचशे किंवा २ हजार रुपयांचे सुट्टे पैसे नसल्यामुळे वस्तूंची खरेदी कशी करायची असा प्रश्न नागरिकांना पडला होता. रिझर्व बँकेने नवी नोट बाजारात येणार असल्याची अधिकृत घोषणा गुरूवारी केली. त्यासोबत जुनी नोटदेखील व्यवहारात वापरली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.१०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर त्याचा पुरवठा वेगाने करण्यात येईल, असे रिझर्व बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

काल संध्याकाळी साखर खरेदी करण्यासाठी घराजवळच्या किराणा दुकानात गेले होते. साखर घेतल्यानंतर मी दुकानदाराला १०० रुपयांची नोट दिली. ती नोट घेण्यास दुकारदाराने नकार दिला. दुकानदाराने सांगितले की, बाजारात १०० रुपयांची नोट आली आहे. सरकारने जुनी नोट चलनातून बाद केली आहे.
– जयश्री घारे, रहिवासी, मानखुर्द

 

काय आहेत १०० रुपयाच्या नव्या नोटेची वैशिष्ट्ये…

१) नोटेवर अगदी लहान अक्षरात RBI, भारत, INDIA आणि १०० असा उल्लेख करण्यात आला आहे.
२) गांधीजींच्या फोटोच्या उजव्या बाजूला नव्या गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी व हमी देणारा संदेश आहे.
३) नोटेचा आकार ६६ मि.मी. x १४२ मि.मी. इतका आहे.
४) नोटेच्या मागील बाजूस गुजरातमधील राणीच्या विहिरीचे चित्र आहे. राणीची विहीर हे गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. युनेस्कोने २०१४ मध्ये या वास्तूला जागतिक वारशाचा दर्जा या विहिरीला देण्यात आला होता. भारतातील सर्व विहिरींची राणी असा या विहिरीचा गौरव युनेस्कोकडून करण्यात आला आहे.

कशी आहे राणीची विहीर

राणी उदयामतीने दहाव्या शतकात चालुक्य काळात ही भव्यदिव्य अशी विहीर बांधली होती. विहिरीची लांबी ६४ मीटर आहे, तर रुंदी २० मीटर आणि खोली २७ मीटर इतकी आहे. गुजराती भाषेत विहिरीला बाव (‘बाव’ला बावडी असेही म्हणतात) म्हणतात. म्हणूनच या विहिरीला राणीची विहीर असे नाव पडले.