संजूची घोडदौड सुरू; दुसऱ्या दिवशी कोट्यवधींची कमाई!

मोठ्या गाजावाजासह प्रदर्शित झालेल्या रणबीरच्या संजू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. अवघ्या तीन दिवसांत चित्रपट ११० कोटी रुपये कमावेल, असे अंदाच चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केले आहेत.

sanju-poster
संजू चित्रपटाचं पोस्टर

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारीत कथानक असलेला बहुप्रतिक्षित संजू चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. राजकुमार हिरानींसारखा दिग्गज दिग्दर्शक जोडीला रणबीरचा कसलेला अभिनय चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. हिराणी आणि रणबीरच्या जोडीची जादू बॉक्स ऑफिसवर चालते का? हे पाहाण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. मोठ्या गाजावाजासह चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत छप्पर फाडके कमाई केली आहे. मात्र चित्रपटाला पहिल्याच दिवशी पायरसीचे ग्रहण लागले. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटतो की काय? याची रणबीरच्या चाहत्यांना धाकधूक लागली होती. परंतु पारयरसी होऊनही चित्रपट तिकिटबारीवर चांगलाच गल्ला जमवताना दिसतोय. संजूने यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम नोंदवला. संजूने सलमान खानच्या रेस ३ आणि टायगर श्रॉफच्या बागी २ चे विक्रम मोडीत काढले.

दोन दिवसांत कमावले ७३.३५ कोटी

१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या संजूने पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३८.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. देशभरात केवळ २ दिवसांत चित्रपटाने ७३.३५ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट पहिल्या ३ दिवसांत ११० कोटी रुपये कमवू शकतो, अनेक चित्रपट विश्लेषकांचे असे मत आहे.

 

सलमानवर रणबीर भारी!

सलमान खानच्या रेस ३ ने पहिल्याच दिवशी २९.१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे ३८.१४ आणि ३९.१६ कोटी रूपये कमावले होते. तीन दिवसांत चित्रपटाने १०६.४७ कोटी रुपये कमावले होते. टायगर श्रॉफच्या बागी २ ने पहिल्या दिवशी २५.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २०.४० कोटी आणि तिसऱ्या दिवशी २७.६० कोटी रुपयांची कमाई केली होती.

पहिल्याच दिवशी चित्रपट लीक

संजू प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा पहिला शो संपण्यापूर्वीच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला. अनेक नेटिझन्सनी लीक झालेल्या चित्रपटाच्या वेबसाईटची लिंक आणि स्क्रीनशॉट ट्वीटर आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे चित्रपटाची एचडी प्रिंट लीक झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर मोठा परिणाम होईल असे सर्वांना वाटत होते. तरीदेखील सिनेमाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.