या स्टंटबाजांना कोण रोखणार?

रविवारी या स्टंटबाजांनी चित्रीत केलेला एक व्हीडिओ व्हायरल झाला असून या स्टंटबाजांना रोखणार कोण ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

train stunts
स्टंट करणारी मुले

रेल्वेत स्टंटबाजी करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्यात चक्क एका प्रवाशाचा फोन चोरताना काही टवाळखोर मुलं व्हिडिओमध्ये दिसत आहेत. जीटीबी स्थानकातून ट्रेन जात असताना अपंग प्रवाशाचा मोबाईल या तरूणांनी चोरल्याचं या सेल्फी व्हिडिओत कैद झालं आहे. अद्यापही मुलं कोण आहेत ? हे स्पष्ट झालेलं नसलं तरी हा व्हिडिओ हार्बर मार्गाच्या चुनाभट्टी आणि जीटीबी नगर दरम्यानचा असल्याचं समजत आहे. दरम्यान या व्हिडिओच्या मदतीनं रेल्वे पोलीस धावत्या गाडीत धुडगूस घालणाऱ्या या मुलांचा शोध घेत आहेत.

काय केलं आहे या व्हिडिओमध्ये मुलांनी?

या व्हिडिओत तरूणांना स्वत:चा जीव धोक्यात घालून खिडकीवर चढताना, दरवाज्यावर लटकून किंचाळताना तुम्ही बघू शकता. रविवारी या स्टंटबाजांनी चित्रीत केलेला एक व्हीडिओ व्हायरल झाला असून या स्टंटबाजांना रोखणार कोण ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. हे स्टंटबाज स्वत:चा जीव तर धोक्यात घालत आहेच, शिवाय इतर प्रवाशांचा जीवही धोक्यात घालत आहेत. मुंबईत लोकल ट्रेन मधून पडून प्रवाशांचा जीव जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात या चार – पाच तरुणांचा हार्बर मार्गावरील धावत्या लोकल मध्ये जीवघेणा स्टंट करतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. हात जरा जरी सुटला तरी आपल्या जीवाला मुकावे लागू शकते याची कल्पनादेखील या मुलांना नाही.

 

कुठे घडला हा प्रकार?

रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. हे स्टंटबाज तरुण कोण आहेत ? याबद्दल सध्या माहिती मिळू शकलेली नाही. गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानकातून लोकल बाहेर पडत असताना यातील एक तरुणाने प्रवाशाचा मोबाईलदेखील हिसकावून घेतल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दरवाज्यातून खिडकीवर चढत असून तो छतावरही चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. अशा स्टंटबाजांना आता नक्की कसं आवरायचं? हा प्रश्नदेखील प्रवाशांना पडला आहे.