घरUncategorizedअटलबिहारी वाजपेयी आणि सोलापूरकरांचा ऋणानुबंध

अटलबिहारी वाजपेयी आणि सोलापूरकरांचा ऋणानुबंध

Subscribe

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आल्यापासूनच सोलापूरकरांची घालमेल सुरू झाली.दिवसभर अटलजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थनासुद्धा झाल्या.परंतु सायंकाळी अटलजी यांच्या निधनाची बातमी समजली आणि सोलापूरकर गहिवरून गेले.कारण अटलजींचे सोलापुरशी नातेही तितके घट्टच होते.

सूर्यकांत आसबे 

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आल्यापासूनच सोलापूरकरांची घालमेल सुरू झाली.दिवसभर अटलजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थनासुद्धा झाल्या.परंतु सायंकाळी अटलजी यांच्या निधनाची बातमी समजली आणि सोलापूरकर गहिवरून गेले.कारण अटलजींचे सोलापुरशी नातेही तितके घट्टच होते. जनसंघाचे अध्यक्ष असताना सोलापूर शहरात तर पंतप्रधान असताना पंढरपुरात धनगर समाजाच्या मेळाव्याला ते आले होते.आपल्या वक्तृत्वाची मोहिनी त्यांनी अनेकांना घातली होती.सोलापुरात त्यांची गजानन हंपी, हणमंत राचेटी, शरयू बडवे,ज्ञानेश्वर गुंड,गोवर्धनदास भुतडा,मथुरादास डागा, बाबुराव बसवंती यांच्याशी अटलजींची घनिष्ठ मैत्री होती.जनसंघाचे अध्यक्ष असताना जवळपास १० ते १२ वेळ ते सोलापुरात आले होते.

- Advertisement -

हरिभाई देवकरन प्रशालेच्या मैदानावर दोनवेळा भाजपचे अधिवेशन झाले त्यालाही अटलजींनी संबोधित केले होते.सोलापूर जनसंघाच्यावतीने अटलजींचे एकसठी साजरी करून त्यांना होम मैदानावर झालेल्या कार्यक्रमात १ लाखांची थैली देण्यात आली होती.यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे तत्कालीन महापौर बाबुराव चाकोते यांनी होम मैदानावर व्यासपीठावर जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांचा सत्कार केला होता.त्यावेळी चाकोते यांच्यावर चौफेर टीका झाली होती,मात्र त्या टीकेला त्यांनी भिख घातली नाही.शिवाय जनसंघाच्या तत्त्कालीन अध्यक्ष शरयूताई बडवे यांच्यासह महिलांनी त्यांचे औक्षणही केले होते. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आणीबाणीकडे कशी वाटचाल सुरू आहे हे अटलबिहारीनी दोन वर्षे अगोदरच जाहीर सभेत सांगून टाकले होते.या सभेला सांगोलाचे तत्कालीन उपनगराध्यक्ष डॉ.डबीर अटलजींच्या कार्यक्रमाला दुचाकीवर आले होते.त्यांनी अटलजींचा सत्कार करून कोल्हापुरला जाताना सांगोला येथील सभेला संबोधित करावे म्हणून केलेली विनंती त्यांनी मान्य केली होती आणि दुसर्‍या दिवशी ते जाणार होते.मात्र डॉ.डबीर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच ते हळहळले. सामान्य कार्यकर्त्याच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी ते सांगोला येथे गेले होते.

१९७३ साली खासदार असताना ते सोलापुरात आले होते.याशिवाय जनसंघाच्या प्रचारानिमित्त ते सोलापुरात आल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासासाठी एसटीचा आधार घेत होते.शिवाय सोलापुरातील त्यांचे घनिष्ठ सहकारी बाबुराव बसवंती यांच्या शेतात मुक्काम करत होते.त्या ठिकाणी पिटले,भाकरी,शेंगा चटणी या अस्सल गावरान जेवणाचा ते मनसोक्त आनंद लुटायचे.कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करून ते कुटुंबात रंगून जायचे.भाजपचे तत्कालीन नगरसेवक जगदीश तुळजापूरकर यांनी आपल्या लग्नाचे निमंत्रण वाजपेयी यांना धाडले होते.त्यासाठी अटलजी आवर्जून १९ एप्रिल १९८८ साली सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याला उपस्थित राहून तुळजापूरकर यांना आशीर्वाद दिले होते.सोलापुरातील बसवंती मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभाला अटलजी १७ मे १९७४ रोजी सोलापुरात आले होते.एकूणच अटलजींचा सोलापूरकरांशी चांगलाच ऋणानुबंध होता.त्यांच्या निधनाने सोलापुरातील जनसंघ , भाजप कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -