घरUncategorizedपुत्र मानवाचा

पुत्र मानवाचा

Subscribe

इंदूर येथे जाऊन वसलेले आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या बातमीने सुरू झालेल्या चर्चा, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आहेतच. पण विज्ञानाचे हवाले देणाऱ्यांच्याही बुद्धीची किव करण्यायोग्य आहेत. आयुष्यात वैफल्याने, निराशेने गांजलेल्या लोकांना आधार देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली, मग तो इतरांना कसला आधार देत होता? अशा स्वरूपाचे विविध प्रश्न विचारायला सुरूवात झाली. हे अर्थातच नवे नाही. कुठल्याही सामान्य माणसाच्या बाबतीत हेच होत असते आणि भय्यूजी महाराज प्रतिष्ठित नामवंत होते. म्हणून त्यावर जाहीर चर्चा झाल्या. यात सहभागी होणाऱ्यांची अशी मनस्थिती असते, की असे पाऊल उचलणाऱ्याच्या जागी आपण असतो, तर कसा शहाणपणा केला असता. जणू आत्महत्येचे पाऊल उचलणारा तद्दन मूर्ख होता आणि त्यावर चर्चा करणारे अतिशय संयमी शहाणे व प्रत्येक कृती विचारपूर्वक करणारे असावेत, असाच मग भास होतो. व्यवहारात तसे कधीच होत नाही. जन्माला आलेला प्रत्येकजण माणूस असतो आणि कृती कर्माने भिन्न असला, तरी त्याच्यात मानवाचे विकार, भावना जशाच्या तशा सुप्तावस्थेत असतात. बाह्य जगात त्याचा वावर त्याने पत्करलेल्या भूमिकेनुसार चालू असतो. आतल्या आत तोही एक सामान्य माणूस असतो आणि लोक त्याला महाराज वा आध्यात्मिक गुरू वगैरे ठरवून बसलेले असतात. लोक त्याच्या आश्रयाला जात असतात. दगडाचा किंवा सोन्याचा देव करून त्याचे भव्यदिव्य देवालय बांधले, म्हणून त्या दगडाला वा सोन्याला आपण देव असल्याचेही ठाऊक नसते. तो निर्जीव पदार्थ असतो. तितकेच महाराज वा आध्यात्मिक गुरू सामान्य माणूसच असतात. मग त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे आत्महत्या केली, तर त्याचे अर्थ लावण्याची काय गरज आहे?

भय्यूजी महाराज असोत किंवा आणखी कोणी आध्यात्मिक गुरू असो, त्याला देवत्व त्याच्या भक्तांनी बहाल केलेले असते. रामरहिम वा आसाराम यांच्यासारखे गुरू तर वाटेल ती थेरे करीत होते आणि तरीही हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या भजनी लागलेले होते. इतर कोणी महंत संत निदान तसे तमाशे करीत नाहीत. या प्रत्येकातील मानवी विकारांवर त्यांनी मात केली आहे, असा आपला समज असतो. किंवा आपण तसे गृहीत धरलेले असते. म्हणून मग त्याने इतरांच्या समजुतीनुसारच जगायला हवे, हा आपला आग्रह असतो. थोडक्यात त्याचे मनाप्रमाणे जगणे, भक्त वा इतरांनी हिरावून घेतलेले असते. नामवंत होणे वा प्रतिष्ठीत म्हणून मिरवणे, जितके कौतुकाचे असते तितकेच जाचक असते. ते एकप्रकारचे लादलेपण सोसून त्या माणसाला कोंडमारा सहन करावा लागत असतो. भय्यूजी महाराज त्याचाच बळी आहेत. आपण जीवनमरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालोय, किंवा जगरहाटीतून आपल्याला मोक्ष मिळाल्याचा दावा त्यांनी केलेला नव्हता. इतर सामान्य लोकांपेक्षा त्यांच्यापाशी सोशिकता वा संयम अधिक असतो इतकेच. त्यातून त्यांच्यावर मग अशा गोष्टी लादल्या जात असतात. त्यांच्या दर्शनाने वा दोन शब्दांनी कुणाला दिलासा मिळतो वा समस्या सोडवण्याचा मार्ग सापडला असेही वाटते. पण बदल्यात अशा व्यक्तीला सामान्य म्हणून जगण्याचीही संधी नाकारली जात असते. मग लोकांच्या अपेक्षा व समजुतींचे ओझे घेऊन त्यांना चालावे लागत असते. मात्र त्याचा ताण किती असतो, ते इतरांच्या लक्षात येत नाही. एकूण समाज असा असतो, की तो कुणाला तरी देव बनवून टाकतो आणि नसेल तर चोर सैतानही ठरवून टाकतो. मग अशा कल्पनांच्या पिंजऱ्यात अशा लोकांना बंदिस्त करून टाकले जात असते. त्यातून होणारा कोंडमारा सहन करू शकणारे गुण्यागोविंदाने नांदतात आणि असह्य होणारे भय्यू महाराजांचा मार्ग चोखाळतात.

- Advertisement -

आपली सगळी दु:खे, समस्या घेऊन त्यावर फुंकर घालण्यासाठी लोक जेव्हा भोवती जमू लगतात, तेव्हा सामान्य माणसालाही तो मोठेपणा हवाहवासा वाटतच असतो. साधा कॅमेरा समोर आला, तर सामान्य माणसाच्या वागण्यात किती फरक पडतो? आपण टीव्हीवर दिसतोय म्हटल्यावर किंवा दिसू इतक्या जाणीवेनेही माणूस झकपक दिसण्याचा प्रयत्न करतो. आपण असे दिसावे किंवा आपल्याविषयी बघणाऱ्याचे मत असे व्हावे, यासाठी धावपळ सुरू होते. मग ज्यांना लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी ओळखले जात असते, त्यांच्या वागण्याजगण्यावर किती निर्बंध येत असतील? तो त्यांच्यातल्या माणसाचा कोंडमाराच नसतो काय? जगाची दु:खे, समस्या ऐकून घ्यायच्या आणि त्यावरचे उपाय सांगण्यात आयुष्य खर्ची पडत असते. त्यांना स्वत:च्या दु:ख समस्या कोणासमोर मुक्तपणे मांडण्याचीही मोकळीक राहिलेली नसते. जगाला न दिसणाऱ्या एका अदृश्य पिंजऱ्यात त्यांना बंदिस्त करून टाकले जात असते. त्याचा किती तणाव त्यांच्यावर येत असेल? ती व्यथा त्यांनी कुठे मांडावी आणि त्यावरचे उपाय कोणाकडून मिळवावे? तो सगळा बोजा कुठेना कुठे व कधीना कधी असह्य होतोच. त्यावर संयमाची पराकोटी करूनच जगणे शक्य असते. मात्र त्यासाठी कमालीचे बेशरम व अमानुष असावे लागते. चार-सहा लाखाच्या सावकारी कर्जासाठी आत्महत्या करणारा शेतकरी अथवा गरीब आणि भय्यू महाराज यांच्यात किंचीतही फरक नसतो. दारात देणेकरी उभा राहिल्यावर अब्रुचे धिंडवडे निघतात म्हणून तो शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतो. उलट त्याच्या लाखोपटीने कर्ज घेऊन परदेशी फरारी होऊ शकणारा मल्ल्या किंवा नीरव मोदी यात मोठा फरक असतो. अब्रु नावाच्या गोष्टीला तिलांजली देऊनच त्यांनी थाटामाटात जगण्याची सिद्धी प्राप्त केलेली असते. अशा लोकांनी भय्यू महाराज वा शेतकरी आत्महत्येविषयी चर्चा करण्यात कितीसे तथ्य असू शकते?

ज्यांच्या सुपुत्रावर घोटाळ्याचे आरोप दाखल झालेत असे चिदंबरम, चारा घोटाळ्याच्या चार आरोपात शिक्षापात्र ठरलेले लालू, नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले व रोज मोदींवर आरोपाची सरबत्ती करणारे सोनिया वा राहुल गांधी, हे खरे सिद्धपुरूष, साध्वी असतात. बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात शिक्षा भोगणारे रामरहिम, आसाराम बापू एकाच रांगेतले असतात. त्यांना जगाच्या अपेक्षा झुगारूनही प्रतिष्ठेने जगणे शक्य असते. ती खरी सिद्धी असते. भय्यू महाराज तितकी मोठी सिद्धी प्राप्त करू शकलेले नव्हते. लोकांना दिलासा देताना आपण सामान्य माणूस म्हणून भावनाविवश होऊ नये, इतकेही त्यांना उमजले नाही. साधूसंत असण्याच्या बोजाखाली चिरडून जगण्यापेक्षा सामान्य माणूस म्हणून कितीही संकटात जगणे अधिक सुखदायी असल्याची जाणीव, त्यांना आत्महत्येकडे घेऊन गेलेली असू शकते. नित्यनेमाने त्यांच्या दारी येणाऱ्या राजकीय नेते, प्रतिष्ठितांचा निर्ढावलेपणा, आपल्या अंगी बाणवता येत नसल्याच्या वैफल्याने भय्यू महाराजांना अधिक निराश केलेले असू शकते. इतरांना जगण्याचा आशय समजावून देताना आपणच त्याला पारखे राहिल्याची धारणा त्यांना आत्महत्येकडे घेऊन गेलेली असू शकते. जो कोणी सामान्य माणूस आहे व आपले सामान्य जीवन जगताना सतत निराशेशी झगडत असतो, त्यालाच भय्यू महाराज यांच्या अशा आततायी कृतीचा अर्थ समजू शकेल. ज्यांना आयुष्यात आशा-निराशा वा प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा असल्या भावनांच्या झोक्यावर बसायची फिकीर उरलेली नाही, त्यांच्याकडून असल्या घटनांचे अर्थ लावले जाऊ शकत नाहीत. शेवटी भय्यू महाराजही एक माणूस होते आणि त्यांची कृती मानवी विकारी मनाला शोभणारीच होती. हे ज्यांना उमजत नाही, त्यांच्या विश्लेषणाला कवडीचा अर्थ नाही. कारण महाराज वा आध्यात्मिक गुरू आभाळातून पडत नाहीत. आईच्याच पोटी जन्माला आलेला तो माणूस असतो. गदिमांनी म्हटलेच आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -