काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर अपघातातून थोडक्यात बचावल्या!

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा येथे आमदार यशोमती ठाकूर यांच्या कारला अपघात होता होता वाचला. शिवशाही बसने ठाकूर यांच्या कारला कट मारला. मात्र, ठाकूर यांच्या कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात झाला नाही. याप्रकरणी अमरावतीच्या तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताची चौकशी करण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

shivshahi bus
अपघात झालेल्या शिवशाही बसचे छायाचित्र

अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथे झालेल्या शिवशाही आणि कारच्या अपघातात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर थोडक्यात बचावल्या आहेत. सध्या नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु आहे आणि नागपूर विधिमंडळात जात असताना मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. तिवसा येथे आमदार यशोमती ठाकूर यांच्या गाडीला शिवशाही बसची टक्कर होणार होती. मात्र वाहनचालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. यशोमती ठाकूर यांच्या कारला परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने जोरदार कट मारल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

असा टळला अपघात…

तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली. आमदार यशोमती ठाकूर आपल्या वाहनात विधिमंडळात जात असताना शिवशाही बसच्या ड्रायव्हरने ठाकूर यांच्या गाडीला ओव्हरटेक करून कट मारल्याने आमदार ठाकूर यांची गाडी रस्त्याच्या कडेला खाली उतरली आणि वाहन चालकाच्या सतर्कतेने यशोमती ठाकूर आणि वाहनात असलेले त्यांचे काका थोडक्यात बचावले.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी शिवशाही बस चालकाला चांगलेच धारेवर धरले. तिवसा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी शिवशाही बसचालक बस वेगाने चालवत असल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.