करोनाची दहशत ः सहा देश नेमबाजी विश्वचषकातून बाहेर

करोना संक्रमणाच्या भीतीपोटी भारतासह अन्य सहा देशांनी नेमबाजी विश्वचषकातून माघार घेतली आहे.

भारताने करोनाच्या भीतीपोटी पुढील महिन्यात सायप्रस येथे होणाऱ्या नेमबाजी वर्ल्डकपमधून  माघार घेतली आहे. ही स्पर्धा ४ मार्च ते १३ मार्च या कालावधीत होणार आहे. एकूणच क्रीडा विश्वात करोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनाच्या संक्रमणाच्या भीतीपोटी चीनसह अन्य सहा देशांनी नेमबाजी विश्वचषकातून माघार घेतली आहे. चीनमध्ये या संक्रमणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अन्य देशांमध्ये याचा प्रभाव पडू नये म्हणून चीनने माघार घेतली. तसेच तायवान, हॉंगकॉंग, मकाऊ, उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान या देशांनीदेखील राष्ट्रीय धोरणानुसार माघार घेतली.

भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने यासंदर्भात जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला भारताच्या आरोग्य मंत्रालयाने परदेश प्रवासासंदर्भात जी नियमावली प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार आम्ही स्पर्धेतून माघार घेत आहोत. कोरोना विषाणूची लागण झालेला एखादा देश तिथे सहभागी होण्याची शक्यता आहे. या विषाणूग्रस्त देशातील खेळाडूंच्या संपर्कात जर भारतीय खेळाडू आले तर त्यांनाही याचा त्रास संभवू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

आशियाई ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेतही बेमुदत वाढ

किर्गिस्तानच्या बिशकिक शहरात २७ ते २९ मार्च दरम्यान होणारी आशियाई ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धा बेमुदत काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आधी झियान शहरात याच दिवशी होणार होती. तेथून ती बिशकिक येथे हलवण्यात आली होती. मात्र बिशकिक येथे होणाऱ्या स्पर्धेच्या भवितव्याबाबत आम्हाला अजून जागतिक कुस्ती महासंघ किंवा किर्गिस्तान संघेटनेकडून अद्याप अधिकृतपणे काहीही कळवण्यात आलेले नाही, असे भारतीय कुस्ती महासंघाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – रसेल दिब्रिटो मुंबई संघात