घरUncategorizedघातक संशयकल्लोळ...!

घातक संशयकल्लोळ…!

Subscribe

गेल्या आठवड्यात जेव्हा नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी तर काही ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी नियुक्त केलेले चार महापालिका आयुक्त व एक अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची जेव्हा अचानक तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलबांगडी केली तेव्हा साहजिकच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना व सामान्य शिवसैनिकांनाही धक्का बसला. प्रश्न मुख्यमंत्र्यांनी दोन-चार पालिका आयुक्त बदलण्याचा नाही तर ज्या जिल्ह्याचे मंत्री हे स्वतः नगर विकास मंत्री आहेत त्यांना विश्वासात न घेता अथवा त्यांच्यावर काही प्रमाणात नकळत अविश्वास दाखवत केलेल्या या तडकाफडकी बदल्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बदल्यांचा चुकीचा संदेश राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात गेला आहे. हा संदेश जसा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चुकीचा आहे त्याहीपेक्षा अधिक तो ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेसाठी अधिक प्रतिकूल व मारक आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण शेवटी महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या जिंकून देण्यासाठी तिथे एकनाथ शिंदेच लागतात.

शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या अपघाती निधनानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला अत्यंत प्रतिकूल आणि खडतर काळ भोगावा लागला होता. मातोश्रीने त्यावेळी पहिल्यांदाच ठाणे शहराबाहेरील मनोहर अंबावणे यांना ठाण्याचे जिल्हाप्रमुख केले होते. मात्र, अंबावणे फार काही करू न शकल्यामुळे पुन्हा ठाणेकर असलेल्या रघुनाथ मोरे यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनाही दुर्दैवाने अपघात झाला आणि मातोश्री ठाणे जिल्ह्याकरिता आक्रमक आणि लढाऊ बाणा असलेल्या जिल्हा प्रमुखाच्या शोधात होती. त्याच वेळी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या देहबोलीशी साधर्म्य असलेले एकच नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आले आणि ते होते …एकनाथ शिंदे यांचे…

फर्डे वक्ते आणि स्व. आनंद दिघे यांच्याप्रमाणे दाढी, कपाळी मधोमध गंधाचा लाल टिळा आणि शिवसैनिकांना अपेक्षित असलेला आक्रमकपणा हे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले. एकनाथ शिंदे यांच्या या रूपातच सामान्य शिवसैनिक त्यांच्यात स्वर्गीय आनंद दिघे यांचे प्रतिबिंब म्हणून पाहू लागला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर खचलेल्या ठाणे जिल्ह्यातील संघटनेला उभारी देण्याचे सर्वात मोठे काम एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख झाल्यानंतर केले हे स्वीकारावेच लागेल. त्यामुळेच ज्याप्रमाणे स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला वैभवाचे व सत्तेचे दिवस दाखवले त्याचप्रमाणे आनंद दिघे यांच्यानंतर शिवसेनेचे हे वैभव आणि सत्ता टिकवण्याचे आणि वाढवण्याचे श्रेयही एकनाथ शिंदे यांच्याकडे जाते.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा ही त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष मजबूत स्थितीत होते. त्यात भाजप हा युतीतला मित्रपक्ष त्यामुळे भाजपशी उघड पंगा घेत शिवसेनेला महापालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुका काही अपवाद वगळता लढवता येत नसत. त्यामुळे एकीकडे मित्र पक्ष भाजपला सांभाळायचे तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी लढायचे अशा स्थितीत शिवसेनेला महापालिका, नगर परिषद यांच्या निवडणुका जिंकून देण्याचे कसब एकनाथ शिंदे यांना करावे लागत असे. मात्र, त्याही वेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे की मित्रपक्ष भाजप आहे याचा कसलाही विचार न करता शिवसेनेचा उमेदवार कसा विजयी होईल याकडेच सर्वाधिक लक्ष दिले. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तर राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पालिकेची ही निवडणूक स्वबळावर लढली आणि ठाण्यामध्ये प्रथमच शिवसेनेने स्वबळावर एक हाती सत्ता काबीज केली.

कल्याण-डोंबिवली हा तर भाजप आणि संघ परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, या बालेकिल्ल्यातही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे महापालिकेच्या कारभाराची सूत्रे ही शिवसेनेकडे राहिली. उल्हासनगरसारख्या सिंधी बहुल महापालिकेतील सत्ताही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे खेचून आणली. अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन नगरपरिषदा शिवसेनेकडे राखण्यासाठी त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. त्यामुळेच या दोन्ही नगरपरिषदाही शिवसेनेला स्वतःकडे राखता आल्या हेही दुर्लक्ष करून चालणार नाही. नवी मुंबई हा तर गणेश नाईक यांचा परंपरागत बालेकिल्ला होता. २०१४ सालच्या मोदी लाटेमुळे नवी मुंबईत भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढीस लागला अशा प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नगरसेवक मोठ्याप्रमाणावर नवी मुंबई महापालिकेत निवडून आणले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर ही शिवसेनेची संघटनात्मक पकड सत्तेच्या माध्यमातून मजबूत झाल्याने यावेळी प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर ही शिवसेनेचा भगवा फडकावून दाखवला हेही लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्याबरोबरच शेजारील पालघर जिल्ह्यामध्येही शिवसेनेला विधानसभा निवडणुकांमध्ये अधिकाधिक विजय कसा मिळेल असेच प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केले गेले. ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेला दोन खासदार मिळाले आहेत. खासदारकी, आमदारकी, जिल्ह्यातील सहा महापालिका, एक जिल्हा परिषद, दोन नगरपरिषदा, पंचायत समिती अगदी ग्रामपंचायतीपर्यंत शिवसेनेला सर्वाधिक यश कसे मिळेल यासाठी सर्वस्व झोकून देऊन शिंदे यांनी आजपर्यंत शिवसेना वाढीचे काम केले आहे हे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतील. त्यामुळेच गेल्या आठवड्यात जेव्हा नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी तर काही ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी नियुक्त केलेले चार महापालिका आयुक्त व एक अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची जेव्हा अचानक तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलबांगडी केली तेव्हा साहजिकच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना व सामान्य शिवसैनिकांनाही धक्का बसला.

प्रश्न मुख्यमंत्र्यांनी दोन-चार पालिका आयुक्त बदलण्याचा नाही तर ज्या जिल्ह्याचे मंत्री हे स्वतः नगर विकास मंत्री आहेत त्यांना विश्वासात न घेता अथवा त्यांच्यावर काही प्रमाणात नकळत अविश्वास दाखवत केलेल्या या तडकाफडकी बदल्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बदल्यांचा चुकीचा संदेश राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात गेला आहे हा संदेश जसा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चुकीचा आहे त्याहीपेक्षा अधिक तो ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेसाठी अधिक प्रतिकूल व मारक आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण शेवटी महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या जिंकून देण्यासाठी तिथे एकनाथ शिंदेच लागतात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कोंडाळ्यातील मंडळी अथवा कोणताही प्रशासकीय अधिकारी कामाला येत नसतो एवढे जरी मुख्यमंत्र्यांनी आणि विशेषतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी लक्षात घेतले तरी खूप झाले एवढेच म्हणावे लागेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -