कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून २५ लाखांना लुटले

फसवणूक प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या कास्टिंग डायरेक्टरने तब्बल १५ जणांना फसवले आहे. जून महिन्यापासून याने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक.

directors
प्रातिनिधिक फोटो

स्ट्रगलर्स कलाकारांना चित्रपटात काम करण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. शुभम उर्फ विराज रॉय असे या आरोपीचे नाव असून त्याने मागील दोन महिन्यात १५ जणांना फसवले आहे. यामधील १२ या महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. रॉयने तोतया कंपनी सुरु करुन याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली. लोकांना संक्षय येऊ नये म्हणून याने फसवणूकीची एक वेगळीच पद्धत वापरली. लोकांकडून परस्पर पैसे न घेता शॉपिंग किंवा इतर गोष्टींची मागणी करत होता. काही काळानंतर लोकांना समजल्यानंतर त्यांनी फसवणूकीची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली. तक्रार दाखल केल्यानंतर या डायरेक्टरला अटक करण्यात आली.

घटनेबद्दल अधिक माहिती

विराज रॉय हा स्वतःला कास्टिंग डायरेक्टर म्हणून बोलवून घेत होता. बॉलिवूडमध्ये आपली चांगली ओळख असल्याचे तो सर्वांना सांगत होता. पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्या यांच्या पत्नीचीही फसवणूक त्याने केली होती. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी याला ताब्यात घेतले असता ही माहिती उघडकीस आली. ‘ड्रीम सक्सेस’ नावाची कंपनी बनवून याने अनेकांना फसवले होते. आपल्या कंपनीबद्दल याने सोशल मीडियावर जाहिरात टाकली होती. फोटोशुट करण्यासाठी येणाऱ्या स्ट्रगलर्स कलाकारांकडून तो फोटोशुटचे पैसे घेत होता. फोटोशुट करण्यासाठी येणाऱ्या मॉडेल्सला भेटण्यासाठी अनेकदा तो हॉटेलमधील रुम्सही बुक करत होता. आत्मविश्वासात घेतल्यानंतर त्यांचे बँक खात्याबद्दल माहिती मिळवत होता. अशा प्रकारे अनेकांकडून त्याने लाखो रुपये काढले. लोकांकडून पैसे घेऊन देखील चित्रपटात काम देत नसल्यामुळे अखेर त्याची तक्रार करण्यात आली.