घरUncategorizedडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण तिन्ही डॉक्टरांचा पोलीस पुन्हा ताबा घेणार

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण तिन्ही डॉक्टरांचा पोलीस पुन्हा ताबा घेणार

Subscribe

डॉ. पायल तडवी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या मूळ प्रतींचा शोध घेण्यासाठी या न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिन्ही डॉक्टरांची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलीस न्यायालयाकडे परवानगी घेणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. सुसाईड नोटची मूळ प्रत पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून या तिघींनी सुसाईड नोट नष्ट केली असण्याची खात्री पोलिसांना पटली आहे. या तिघींनी या सुसाईड नोटच्या मूळ प्रती कशाप्रकारे नष्ट केल्या हे जाणून घेण्यासाठी या तिघींकडे चौकशी करण्यात येणार आहे. तसेच पायलच्या हस्ताक्षराचे नमुने पोलिसांनी घेतले असून ते नमुने आणि पायलचा मोबाईल फोन न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत हस्ताक्षर तज्ज्ञ यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या गुन्हयातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघींच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी हिने आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाईड नोट लिहिल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र सुसाईड नोटच्या मूळप्रती अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत. पोलिसांना पायलच्या मोबाईल फोनमध्ये सुसाईड नोटच्या फोटो कॉपीज मिळून आलेल्या आहेत. तपास अधिकार्‍यांनी पायल तडवीचे हस्ताक्षर असलेले नमुने घेतले असून हे नमुने आणि पायलच्या मोबाईल फोनमध्ये मिळून आलेले फोटोकॉपीजमधील हस्ताक्षर तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत हस्ताक्षर तज्ज्ञ यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

डॉ. पायल हिला आत्महत्येपूर्वी डॉ. हेमा आहुजा हिने फोन केला होता. त्यावेळी दोघींत काही मिनिटे संभाषण झाले. त्यानंतर काही वेळाने हेमा आहुजाने पायलला फोन केला. मात्र ती फोन उचलत नसल्याचे बघून हेमा आहुजा ही आपल्या इतर सहकारी डॉक्टरसह पायलच्या खोलीवर आल्या. मात्र आतून दाराला कडी असल्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांची मदत घेऊन दार उघडले असता डॉ. पायल ही गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आली. या तिघींची इतर कर्मचार्‍यांच्या मदतीने पायलला खाली उतरवून उपचारासाठी अतिदक्षता विभागात नेत असताना डॉ. हेमा आणि डॉ. अंकिता या दोघी पायलच्या खोलीजवळ आल्या होत्या. तीन मिनिटे या तिघी पायलच्या खोलीजवळ घुटमळत असल्याचा तेथील पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -