यंदाही इंजिनियरींगची बाके रिकामी?

संस्थांची कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज

दरवर्षी इंजिनियरींग कॉलेजमध्ये रिक्त राहणार्‍या जागांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षणसंस्थांनी यंदा इंजिनियरींग कॉलेज बंद करण्यासंदर्भात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेकडे (एआयसीटीइ) अर्ज केले आहेत. या अर्जांना परवानगी मिळाल्यास राज्यातील इंजिनियरींगच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असली तरी यावर्षीही मुंबईसह राज्यातील इंजिनियरींग कॉलेजातील बाके मोठ्या प्रमाणात रिकामी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा साधारणपणे 20 हजार जागा रिक्त राहण्याचा प्राथमिक अंदाज शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रवेशाची नियमावली जाहीर न केल्याने राज्यातील इंजिनियरींग प्रवेशप्रक्रियेला अद्याप सुरूवात झाली नसल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्वी इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमांना जागांच्या तुलनेत प्रवेश घेणार्‍यांची संख्या जास्त असायची. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागायची परंतु आता उलटे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा सीईटी परीक्षेसाठी तब्बल 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा इंजिनियरींग, फार्मसी आणि कृषीविषयक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येते. त्यापैकी दोन लाख 76 हजार 166 विद्यार्थ्यांनी पीसीएम संवर्गासाठी अर्ज केले होते. यातील जवळपास 1 लाख विद्यार्थी इंजिनियरींगसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ‘जागा जास्त व विद्यार्थी कमी’ अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी असलेल्या 1 लाख 35 हजार जागांवर फक्त ९००० इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मात्र यावर्षी नियमावलीच जाहीर न झाल्याने जागांची क्षमताच सीईटी सेलकडून जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया राबवण्यात अडचणी येत आहेत. राज्यातील सरकारी व खासगी संस्थांमधील इंजिनियरींग अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रिया सीईटीमार्फत राबण्यात येते. यंदा सीईटीची परीक्षा होऊन त्याचा निकाल लागला तरी अद्याप प्रवेश नियमावली जाहीर न केल्याने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू झाल्यास त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे इंजिनियरींग शाखेकडे विद्यार्थ्यांचे कमी होत असलेले ओढा व दुसरीकडे प्रवेशप्रक्रियेसाठी होत असलेला विलंब यामुळे यंदाही इंजिनियरींगचे बाके रिकामी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

• पूर्वी इंजिनियरींगला प्रवेश घेणार्‍यांची संख्या जास्त असे
• यंदा नियमावली जाहीर न झाल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली
• ‘जागा जास्त, विद्यार्थी कमी’ अशी स्थिती