घरUncategorizedमुंबईची लाईफलाईन थांबली; पण मुंबईचा डबेवाला नाही!!

मुंबईची लाईफलाईन थांबली; पण मुंबईचा डबेवाला नाही!!

Subscribe

भूक भागवणे हेच आपले परम कर्तव्य! मंगळवारच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर देखील मुंबईचा डबेवाला आपला कर्तव्य विसरला नाही. जेवणाची होणारी नासाडी लक्षात घेता डब्बेवाल्यांनी रोटी बँकच्या माध्यमातून तब्बल १००० जणांची भूक भागवली.

मंगळवारी सकाळी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे तब्बल १६ तास बंद होती. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. साहजिकपणे त्याचा परिणाम ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांवर झाला. कितीही मोठे आणि कोणतेही संकट आले तरी मुंबईकरांचे स्पिरीट मात्र कायम असायचे. पण मंगळवारच्या दुर्घटनेनंतर मात्र मुंबईकर हतबल होते. त्याचा परिणाम झाला तो मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांच्या सेवेवर! विरार – चर्चगेट लोकल सेवा बंद असल्याने डब्बा पोहोचवायचा कसा? हाच यक्ष प्रश्न डब्बेवाल्यांच्या पुढे उभा राहिला. डब्बा घरी पोहोचवणे हाच एकमेव पर्याय. पण, त्यावर देखील मुंबईच्या डब्बेवाल्यांनी शक्कल लढवत जवळपास १००० गरजूंची भूक भागवली. डब्बा घरी परत करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यामुळे जेवण खराब होण्याची शक्यता लक्षात घेता डब्बेवाल्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

…अन् डबेवाल्यांनी भागवली १००० गरजुंची भूक

मंगळवारी गोखले पूल कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे पश्चिम रेल्वे स्थानकांवर गोंधळाची स्थिती पाहायला मिळत होती. याचा परिणाम मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेवर देखील झाला. ऑफिसला पोहोचवायला डबे आणले खरे पण लोकल सेवा ठप्प झाल्याने डब्बे पोहोचवायचे कसे? हाच यक्ष प्रश्न डबेवाल्यांच्या पुढे उभा राहिला. डबेवाला असोसिएशनने डबे पुन्हा घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. पण, जेवण खराब होण्याची शक्यता लक्षात घेता जेवण रोटी बँकला दान करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. डबेवाल्यांच्या या निर्णयामुळे जवळपास १००० गरजू लोकांची भूक भागली. डबेवाल्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

काय आहे रोटी बँक

अन्नाची होणारी नासाडी लक्षात घेता २०१७ साली महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक डी. शिवनंदन यांनी रोटी बँकची स्थापना केली. या रोटी बँकच्या माध्यमातून भुकेलेल्यांना अन्नदान केले जाते. २४ तास ही रोटी बँक सुरू असते. ज्या व्यक्तीला अन्नदान करायचे आहे ती व्यक्ती रोटी बँकशी ९१११८९१११८ नंबरवर संपर्क करून अन्नदान करू शकते. त्यानंतर हे जेवण गरजूपर्यंत पोहोचवले जाते. शिवाय www.rotibankindia.com या संकेतस्थळाला भेट देऊन देखील तुम्ही अन्नदान करू शकता. याच रोटी बँकच्या माध्यमातून मुंबईतील डबेवाल्यांनी मंगळवारच्या दिवशी अन्नदान करून जवळपास १००० गरजू लोकांची भूक भागवण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -