घरUncategorizedकळवा रूग्णालयातील भोंगळ कारभार नगरसेवकांनी सभेत मांडला

कळवा रूग्णालयातील भोंगळ कारभार नगरसेवकांनी सभेत मांडला

Subscribe

महापालिकेच्या रूग्णालयात गोरगरीब रूग्ण येतात. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात न पाठविता त्यांच्यावर तेथेच उपचार करावेत अशी कानउघडणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून, डॉक्टरांकडून रूग्णांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. नगरसेवकांचेही फोन उचलले जात नाही. रूग्णांना सोयी सुविधा दिल्या जात नाही अशा विविध कारणांवरून बुधवारच्या सर्वसाधरण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कळवा रूग्णालयातील भोंगळ कारभाराची चिरफाड केली. शिकाऊ डॉक्टरांनी रूग्णांच्या नातेवाईकांशी कसे बोलावे? ही समज त्यांना देण्यात यावी. तसेच महापालिकेच्या रूग्णालयात गोरगरीब रूग्ण येतात. त्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात न पाठविता त्यांच्यावर तेथेच उपचार करावेत अशी कानउघडणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

रुग्णालयातील १२ डॉक्टरांची पदे रिक्त

कळवा रूग्णालयातील नवजात बालकांसाठीच्या ‘एनआयसीयू’ विभागात बालकांना दाखल करून घेतले जात नसल्याचा मुद्दा नगरसेवक संजय भोईर यांनी महासभेत उपस्थित केला होता. त्यावेळी रूग्णालयातील अनागोंदी कारभार, सोयी सुविधांचा अभाव आदींवर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गटनेता नारायण पवार यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रूग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरसह सर्वच कर्मचारी झोपले होते. रूग्णालयाच्या जिन्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत बॅन्डेज पडले होते. अशा भोंगळ कारभाराचा नमुना मांडला. त्या सगळ्याचे छायाचित्रही काढल्याचे त्यांनी सांगितले. रूग्णांना सुविधा न मिळाल्यास ते नगरसेवकांकडे धाव घेतात. मात्र अनेकवेळा डॉक्टरांचे फोनही लागत नाहीत. रूग्णालयातील लॅण्ड लाईनवर फोन केल्यानंतर नगरसेवक बोलतोय म्हटल्यावर डॉक्टर फोनही घेत नाहीत. शिकाऊ डॉक्टरांकडून रूग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही, असा संताप सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केला. नातेवाईकांच्या अडीअडचणी समजून घ्या, त्यासाठी सोशल वर्करची नेमणूक करा, शिकाऊ डॉक्टरांना समज देण्यावी यावी, असे मुद्दे नजीब मुल्ला यांनी मांडले. रूग्णालयात ७३ डॉक्टर पदे मंजूर असून ६१ डॉक्टर आहेत. १२ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. याकडेही मुल्ला यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

रूग्णालयातील गैरसोयींवर कडक भूमिकेची मागणी

सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी डॉक्टरांकडून नगरसेवकांचे फोन उचलत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला. हे खाजगी रूग्णालय नसून पालिकेचे आहे. रूग्णालयातील सोयी सुविधांसाठी जितका निधी हवा असेल तितका निधी महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून मंजूर केला जातो. नगरसेवक हे पालिकेचे विश्वस्त आहेत. त्यामुळे त्यांचा फोन उचलायलाच हवा असे म्हस्के म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय आरोग्य अधिकारी नेमण्यात आले आहेत. मात्र ते सक्षम नसल्याचेही म्हस्के म्हणाले. ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनीही रूग्णालयातील गैरसोयींवर कडक भूमिका घेण्याची मागणी केली.

रूग्णालयात दररोज दोन हजार बाह्य रूग्ण तपासणीसाठी येतात. नवजात बालकांसाठी २० बेडचे एनआयसीयू विभाग असून त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. आयसीयू विभागाच्या बाजूला स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कामाला किमान दीड-दोन महिने लागणार आहेत. रूग्णालयात दररोज ७० महिलांची प्रसुती होते. एनआयसीयू क्षमतेपेक्षा अधिक बालक आल्यानंतर त्यांना दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्याही रूग्णाला परत पाठविले जात नाही. मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. संध्या खडसे, ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठाता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -