घरUncategorizedप्रत्येक जन्मी हिच ताई मिळो!

प्रत्येक जन्मी हिच ताई मिळो!

Subscribe

नातं म्हटलं की, रागावणं चिडणं आलंच. पण वैशू ताई कायमच याला अपवाद राहील. तिचा मला नेहमीच अभिमान वाटतो. आयुष्यात कोणाकडूनही काही अपेक्षा न करता नेहमी ती सर्वांना समजून घेत आली. तिनं जे काही आयुष्यात मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर. कधीही हार न मानता, न चिडता ती पुढे जात राहिली. लहान वयातच तिला कॅन्सर झाला.

आठवण मनातल्या कोपर्‍यातील अशी एक गोष्ट आहे जी कायम आपल्या सोबत असते. चांगल्या आणि वाईट गोष्टीने जी आपल्या चेहर्‍यावर हसू फुलवते तर कधी डोळ्यांच्या कडा पाण्याने ओल्या करते. माणसाच्या आयुष्यात असे बरेच क्षण येतात, ज्यामुळे मन हळवे होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे क्षण आठवणी म्हणून राहिल्या असतील तर, त्याचा त्रास कदाचित दिवसागणिक वाढत जातो. माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद आठवण अर्थात माझी ताई. माझी मोठी बहीण माझ्या मनात कायमचं आठवणीचं घर करून राहिली आहे. मोठी बहीण ही आईप्रमाणेच माया करते, रागावते, लाड करते. तिचं रागावणं हे मायेपोटीच असतं. पण ती आपली प्रत्येक गोष्ट समजून घेते. आईवडिलांच्या ओरड्यापासूनही वाचवते. पण आज हेच तिचं प्रेमाचं छत्र आपल्या डोक्यावर नाही याचा त्रास कायम होत राहतो आणि राहील.

माझ्या ताईचं नाव वैशाली. पण तिला वैशु ताई म्हणायचे मी. ती आता या जगात नाही. तिला जाऊन दोन वर्ष झाली पण अजूनही एकही असा दिवस नाही की, मी तिच्याशी बोलले नाही. एकटी असतानाही मी तिच्याशी बोलते. तिचा आवाज ऐकण्यासाठी बोलण्यासाठी आतुर होते. पण ती कमी तिचे व्हीडिओज पाहून आता पूर्ण करते. माणूस असताना त्याची किंमत कळत नाही पण त्याच्या आठवणी मात्र त्याची किंमत गेल्यानंतर जाणवून देतात हे नक्की. आम्हा दोघींमध्ये तसं अकरा वर्षांचं अंतर. पण ते अंतर आमच्या नात्यात कधीच आलं नाही. लहानपणापासूनच ती माझी जवळची मैत्रीण होती. खरं तर मी तिच्यासाठी काही करण्यापेक्षा तिनंच सगळी कर्तव्यं पार पाडली.

- Advertisement -

नातं म्हटलं की, रागावणं चिडणं आलंच. पण वैशू ताई कायमच याला अपवाद राहील. तिचा मला नेहमीच अभिमान वाटतो. आयुष्यात कोणाकडूनही काही अपेक्षा न करता नेहमी ती सर्वांना समजून घेत आली. तिनं जे काही आयुष्यात मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर. कधीही हार न मानता, न चिडता ती पुढे जात राहिली. लहान वयातच तिला कॅन्सर झाला. हा तिच्यासाठी आणि घरच्या सगळ्यांसाठीच मोठा आघात होता. त्यालाही तिनं हिमतीनं लढा दिला. कोणालाही न कळता त्या वेदना तिनं सहन केल्या. सर्व सहन करत असताना आपल्यामुळं दुसर्‍याला त्रास होऊ नये ही तिनं शेवटपर्यंत जपलं. तिच्या आठवणी आजही ताज्या आहेत. माणूस इतका समजूतदार कसा असू शकतो? याचं खरं तर मूर्तीमंत उदाहरण वैशू ताई होती. आम्हा चारही भावंडांमध्ये सर्वात मोठी असल्याचा कधीही फायदा तिनं घेतला नाही. तर मोठेपणा मिरवला नाही. ती खर्‍या अर्थानं ‘मोठी’ बनून राहिली.

आजही तिची प्रेमाची ‘डॉली’ ही हाक ऐकण्यासाठी मन आसुसतं. या सगळ्या आता फक्त आठवणी राहिल्या आहेत. पण या आठवणी मला मनाच्या कोपर्‍यात कायम जपून ठेवायच्या आहेत. जाताना माझ्या आठवणीवनं रडू नको असं ताईनं सांगूनही आता तिच्या आठवणी लिहिताना डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. बस देवाकडे या आठवणी येताना एकच मागणं राहील, प्रत्येक जन्मी मला हीच ताई मिळो…पण त्या प्रत्येक जन्मात तिला मोठं आयुष्य लाभो.

- Advertisement -

—————————————-

– अंजली मंत्री-मुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -