घरUncategorizedस्वकियांनी सारले, खुल्या प्रवर्गाने तारले

स्वकियांनी सारले, खुल्या प्रवर्गाने तारले

Subscribe

उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये लक्षवेधी ठरलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी आघाडीचे धनराज महाले यांना सपशेल धूळ चारत जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सोनेरी अक्षरांची नोंद केली आहे. कळवण व सुरगाणा या होमटाऊनमध्ये त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवण्यात अपयश आले तरी, खुल्या प्रवर्गातील नांदगाव, येवला, चांदवड आणि निफाड येथील मतदारांनी त्यांना विजयश्री मिळवून दिली. गेल्या वेळी भाजपकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपकडूनच विजयाची माळ गळ्यात पडली. जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून आदिवासींच्या कुपोषणावर आवाज उठवणार्‍या डॉ. भारती पवार संसदेपर्यंत पोहोचल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी लोकसभेत पुन्हा भाजपचे कमळ फुलले आहे.

कळवण-सुरगाणा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित यांनी वर्चस्व राखले. तसेच राष्ट्रवादीचे नेते तथा डॉ. भारती पवार यांचे दीर नितीन पवार यांनी कळवणमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित आघाडी मिळवून दिली. डॉ.पवारांना आपल्या होमटाऊनमध्ये अपेक्षित मताधिक्य मिळवण्यात अपयश आले. या तुलनेत धनराज महालेंना दिंडोरी व पेठ तालुक्यात चांगली आघाडी मिळाली. येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनी युतीच्या विरोधात काम केले. त्यामुळे गावितांची भूमिका संशयास्पद राहिली. मात्र, भाजपने माजी आमदार रामदास चारोस्कर यांना पक्षात घेऊन ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. चारोस्करांनी उभा केलेल्या एकहाती तंबूमुळे काही प्रमाणात भाजपला दिंडोरीत यश आले, तर पेठमध्ये पिछाडीवर राहिले. आदिवासी तालुक्यांनी डॉ.पवारांना यांना साथ न दिल्यामुळे उर्वरित मतदारसंघांमध्ये मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती होती. त्यामुळे एक्झिट पोल काहीही सांगत असले, तरी उमेदवारांना शेवटच्या दिवसापर्यंत विजयाची खात्री नव्हती. देवळा-चांदवड मतदारसंघात खर्‍या अर्थाने स्थानिक नेत्यांमध्ये मतांची आघाडी मिळवण्यासाठी रस्सीखेच दिसून आली. येथे आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. या तुलनेत आघाडीच्या नेत्यांचा एकमेंकामध्ये सूर न मिसळल्याने त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उत्तमबाबा भालेराव यांचे प्रयत्न तोकडे पडले. देवळा तालुक्यातील उमराणे या गटात डॉ. पवार या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्याने त्यांचा या निवडणुकीत थेट फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे देवळा तालुक्यात सर्वत्र कमळ फुलले. या तुलनेत निफाड तालुक्यात शेतकर्‍यांची नाराजी प्रकर्षाने जाणवली. भाजपविरोधी वातावरण असल्यामुळे त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात असताना मविप्र संस्थेने भाजपला पूरक भूमिका घेतली आणि शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी अस्तित्वाची ही लढाई केली. माजी आमदार दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादीसाठी केलेले प्रयत्न अपूर्ण पडल्याचे निकालाअंती दिसून आले आहे.

- Advertisement -

भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नांदगाव व येवला मतदारसंघ शिवसेनेने भेदला असून या दोन्ही मतदारसंघात डॉ.भारती पवारांना निर्णायक आघाडी मिळाली. नांदगावमध्ये गणेश धात्रक, माजी आमदार संजय पवार, बापूसाहेब कवडे, रत्नाकर पवार, जे. डी. हिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी भुजबळांच्या किल्ल्याला सुरुंग लावले. या तुलनेत राष्ट्रवादीसाठी फारसे प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही. भुजबळांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला सर्वाधिक मतांची आघाडी मिळण्याची शक्यता होती. मात्र, शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे आणि संभाजी पवार, रुपचंद भागवत यांनी संयुक्तपणे केलेल्या कामगिरीमुळे येवल्यातही युतीलाच ’आघाडी’ मिळाली. हा भुजबळांसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो. डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेऊन येण्यात आमदार डॉ.राहुल आहेर व त्यांचे बंधू केदा आहेर यांची महत्वाची भूमिका राहिली. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी पवारांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांना जवळ करण्यात यश मिळवले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, कृष्णा पारखे यांची साथ मिळल्याने विजयाचे समीकरण अधिक सोपे झाले.

सोशल मीडियावर आघाडीची खिल्ली

नाशिक-लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीस सुरुवात झाली. तशी सोशल मीडियावर महायुती व आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुरस निर्माण करणारे मेसेज, इमेज अपलोड केल्या जात होत्या. दुपारपर्यंत मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने असल्याचे समजताच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर इमेज अपलोड करणे बंद केले, तर युतीच्या कार्यकर्त्यांनी लाव रे लाव व्हिडिओ लाव, राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ या सुपरहिट वाक्याची खिल्ली उडवणार्‍या इमेजेस अनेकांनी सोशल मीडियावर अपलोड केल्या. दिवसभर आघाडी व राज ठाकरे यांच्या खिल्ली उडवणार्‍या इमेज सोशल मीडियावर अपलोड झाल्याने अनेकांचे मनोरंजन झाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -