राममंदिर भुमीपूजन : त्र्यंबकेश्वरहून माती आणि गोदाजल आयोध्येला रवाना

Ayodhya

अयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या राम मंदिराकचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहेत. यासाठी त्र्यंबकेश्वर येथून माती आणि गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ठिकाणचे पाणी, कुशावर्त तीर्थ अयोध्या येथे पाठवण्यात आले आहे. श्रीराम मंदिर भूमिपूजन समारंभास महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित असलेले १००८ महंत जितेंद्रनाथ महाराज हे आज अयोध्या येथे हा कलश घेउन रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भुमिपूजन होणार आहे. या भुमिपूजन सोहळयाला देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, काही प्रमुख पाहुणे यांना आंमत्रित करण्यात आले आहे. याकरीता देशभरातील तीर्थ स्थानांवरून पवित्र माती तसेच नद्यांचे जल अयोध्येला नेण्यात येत आहे. या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पवित्र जल व त्र्यंबकेश्वर नगरीतील पवित्र माती सदर कार्यक्रमासाठी आज विधिपूर्वक पूजन करून रवाना करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघ व अयोध्येत कारसेवेप्रसंगी गेलेले श्रीरामभक्त कारसेवक व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीर्थराज कुशावर्त येथे ब्रह्मगिरीवरून आणलेल्या मूळ गोदावरीच्या तीर्थाचे व कुशावर्त तीर्थाचे विधिपूर्वक पूजन करण्यात येउन या भुमिपूजनासाठी महाराष्ट्रातून आंमत्रित १००८ महंत जितेंद्रनाथ महाराज यांच्याकडे हा कलश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांच्या हस्ते गोदावरी व पवित्र मातीचे पूजन करण्यात आले. या पूजनाचे लोकेशशास्त्री अकोलकर यांनी पौरोहित्य केले. यावेळी पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष मनोज थेटे , जयदिप शिखरे, राजाभाऊ जोशी,श्रीनिवास गायधनी, गिरीश लोहगावकर, संजय लोहगावकर आदिंसह पुरोहीत उपस्थित होते.