घर Uncategorized सावर रे!

सावर रे!

Subscribe

अलीकडच्या काळात एका नववीत शिकणार्‍या मुलीचा आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यानंतर वैद्यकीय क्षेत्रासह सामान्यांच्या वर्तुळात ताण-नैराश्य या विषयांवर चर्चा सुरू आहेत. त्यानिमित्ताने डिप्रेशनचा घेतलेला हा धावता आढावा...

जगातील पहिल्या दहा आजारांच्या यादीत डिप्रेशन अर्थात नैराश्य या आजाराचा समावेश होतो. आजघडीला भारतात नैराश्यग्रस्त लोकांची संख्या ४ कोटींच्या जवळपास गेलीय. आजाराकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सुधारत असला तरी त्याचा वेग फारसा समाधानकारक नाहीय. डिप्रेशनबद्दल सामान्य जनतेत काय आणि मानसतज्ज्ञ वगळता इतर डॉक्टर्समध्ये काय, फार मोठे गैरसमज आणि अपुरे ज्ञान आहे. डिप्रेशन हा डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडीजम, हार्ट डिसीज, हायपर अ‍ॅसिडिटी, इन्सोम्निया यासारख्या आजारांच्या यादीत गणण्याजोगा आजार आहे. एखाद्या दम्याच्या रुग्णाला कुणी म्हणेल का, की नीट श्वास घेत जा रे! माझ्याकडे बघ मी किती फिट आहे! तसेच नैराश्यग्रस्त व्यक्तीला सकारात्मक विचार कर, वेळेवर झोपत-उठत जा असं सांगत राहणं निरर्थक असतं.

काय करता येईल?

तज्ज्ञाचा (सायकियाट्रिस्ट किंवा समुपदेशक) यांचा सल्ला व उपचार घ्यावेत.
नैराश्य, अस्वस्थता, ताणतणाव हा सध्या सामान्यांच्या जीवनाचा भाग झालाय. वेळीस निदान झाल्यास यांचे उपचार सर्वत्र व सहज उपलब्ध आहेत. समाजमाध्यमांवर जबाबदारीने वावरावे. नैराश्याला निमंत्रण देणारे किंवा त्याचा प्रचार-प्रसार करणारे व्हीडिओज फॉरवर्ड करू नयेत. समाजमाध्यमांवर किंवा प्रत्यक्ष आयुष्यात डिप्रेस्ड व्यक्ती आढळ्यास त्याची थट्टा-मस्करी करू नये. हा गंभीर आजार असल्याने त्या व्यक्तीला उपचार घेण्यास प्रेरित करावे.

- Advertisement -

आत्महत्या केलेल्या व्यक्तीची शवचिकित्सा केल्यावर प्रामुख्याने असे लक्षात येते की बहुतेक वेळा
अ) आत्महत्येच्या मुळाशी नैराश्याचा आजार असतो. आत्महत्येच्या यशस्वी प्रयत्नांमागे ९५ टक्के लोकांना जिवंतपणी डिप्रेशन असल्याचे दिसते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झालेले असते.
ब) अशा लोकांनी अनेकदा आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पनाही दिलेली असते. मात्र लोक त्याच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत.
क) तो क्षण कधीच सांगून येत नाही. नकारात्मक विचारांच्या दडपणात सतत राहून एका दबावाच्या क्षणी घेतलेला निर्णय म्हणजे आत्महत्या.

डिप्रेशन कसे ओळखावे ?

खाली दिलेल्यापैकी कुठलेही एक किंवा अनेक लक्षणे २ आठवड्यापेक्षा जास्त वेळ असली की डिप्रेशनचे निदान होऊ शकते.

  • सतत निराश, दु:खी वाटणे
  • अस्वस्थता वाढणे
  • कमी किंवा अधिक स्वप्न असलेली झोप
  • भूक न लागणे
  • आत्मविश्वास कमी होणे
  • नकारात्मकता बळावणे
  • व्यसनांचे प्रमाण वाढणे
  • लैंगिक कमवुतपणा किंवा संबंधांची इच्छा न होणे
  • दैनंदिन कामात चुका होणे इत्यादी.

- Advertisement -

डॉ. मंगेश घुलघुले
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत)

 

- Advertisment -