स्वतंत्र भारताचे पहिले अर्थतद्न्य 

सी.डी.देशमुख
द्वारकानाथ गणेश देशमुख आणि भागिरथीबाई यांचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ मध्ये रायगड किल्ल्या जवळच्या नातेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रोहा आणि तळा येथे झाले तर त्यांचे शालेय शिक्षण एलफिन्स्टन हायस्कूल बॉम्बे येथे झाले. ११ ऑगस्ट १९४३ रोजी ते रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर बनले.
१९१२ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण झाले. त्याकाळी ही परीक्षा युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे घेत असे. संस्कृत विषयात सर्वोच्च गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे ते पाहिले मानकरी होते. १९१७ मध्ये त्यांनी इंग्लंडच्या जिझस कॉलेज, केंब्रीज येथून सायन्सची पदवी घेतली. बॉटनी विषयासाठी त्यांना फ्रँक स्मार्ट पारितोषिक मिळाले. १९१८ मध्ये त्याकाळी फक्त इंग्लंडमध्येच घेतली जाणारी भारतीय प्रशासकीय अधिकारी सेवा परीक्षा देऊन त्या परीक्षेत ते पहिले आले. १९२० साली ते भारतात परत आले आणि प्रशासकीय सेवेत रुजू झाले. इथे सी.डी.देशमुख यांनी विविध अधिकारपदे भूषविली. १९३१ साली झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत ते सेक्रेटरी जनरल यांचे सचिव होतेसी. देशमुख नंतर ते वित्त व जनकल्याण खात्याचे सचिव झाले. ते भारतीय सरकारच्या शिक्षण आणि आरोग्य खात्याचे संयुक्त सचिवही होते. पॅरिस येथील गव्हर्नर्सच्या संयुक्त वार्षिक सभेचे अध्यक्ष म्हणून ते १९५० मध्ये निवडून आले.
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून यांनी पहिल्या पंचवार्षिक योजनेला आकार दिला. देशमुख यांच्या कारकिर्दीत त्यांनी सहा अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याची विशेष नोंद अशासाठी घेतली जाते कि भारतीय अर्थव्यवस्थेचे परिणामकारक नियोजन आणि तिची स्थिर प्रगती यामुळे शक्य झाली. १९४० च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेची जी दुरवस्था झाली होती ( युद्धकालीन परिणाम ) त्यातून आता तिची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. १९५६ ते १९६१ या कालावधीत सी.डी. देशमुख हे भारतातील युनिर्व्हसिटी ग्रँट कमीशनचे अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी विश्वविद्यालयांच्या वाचनालयांच्या उभारणीचे आणि विकासाचे कार्य केले.

१९५७ मध्ये ते नॅशनल बुक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष झाले. पुस्तकांच्या किमती वाचनालयांच्या आणि वाचकांच्या आवाक्यातल्या रहाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १९६२ ते १९६७ या काळात ते दिल्ली विश्वविद्यालयाचे दहावे कुलगुरु म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांच्या प्रयत्नांनीच दिल्ली विश्वविद्यालयाला अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशनची १० लाख डॉलर्सची ग्रँट मिळू शकली. १९३७ साली देशमुख यांची ‘कंपँनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एंपायर’ म्हणून नेमणूक झाली. १९४४ साली ब्रिटिश सरकारकडून त्यांना ‘सर’ ही पदवी देण्यात आली. कलकत्ता युनिर्व्हसिटीची मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी त्यांना१९५७ मध्ये प्रदान करण्यात आली. १९५९ मध्ये पंजाब युनिर्व्हसिटीची डी. लिट. पदवी त्यांना बहाल करण्यात आली. उल्लेखनीय प्रशासकीय अधिकारी म्हणून १९५९ मध्ये त्यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले. देशमुख यांची केंब्रिज येथील जिझस कॉलेजने १९५२ मध्ये फेलोशिपसाठी निवड केली व त्यांच्या भारतीय आणि आंतराष्ट्रीय आर्थिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. १९७५ मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मान मिळाला.

सी. डी. देशमुख यांनी १९२० साली रोझिना आर्थर विलकॉक्स यांच्याशी विवाह केला. त्यांच्या कन्येचे नाव प्रिमरोझ. रोझिना यांचा १९४९ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर १९५३ मध्ये त्यांनी दुर्गाबाई देशमुख यांच्याशी विवाह केला. १९७४ मध्ये सी. डी. देशमुख यांनी आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले. १९८० मध्ये दुर्गाबाईंची स्मरणकथा प्रसिद्ध झाली. १९८१ साली दुर्गाबाईंचे निधन झाले. २ ऑक्टोबर १९८२ रोजी सी. डी. देशमुख यांचे हैद्राबाद येथे निधन झाले.