घरUncategorizedपंचनाम्यासाठी उरले दोन दिवस; प्रशासनाची धावपळ

पंचनाम्यासाठी उरले दोन दिवस; प्रशासनाची धावपळ

Subscribe

पंचनामे झालेली यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात येणार आहे त्यामुळे वंचित शेतकर्‍यांना त्याची माहिती मिळून ते नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत करू शकणार आहेत.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे कृषी व महसुल विभागाची धावपळ सुरू आहे. दरम्यान पंचनामे झालेली यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात येणार आहे त्यामुळे वंचित शेतकर्‍यांना त्याची माहिती मिळून ते नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत करू शकणार आहेत.

दोन दिवसात पंचनामे पूर्ण होणार?

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. त्यामुळे कांदा, द्राक्ष मका, सोयाबीन आदि पिकांचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यापैकी सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीत पाणीच पाणी दिसू लागले. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले. मात्र सुरूवातीच्या काळात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवारात चिखल झाल्याने पंचनाम्यात अडथळे निर्माण झाले. आता ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांच्या संयुक्त पथकाद्वारे पीक नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले जात आहेत. जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून आतापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. अजूनही दिड लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शिल्लक राहीले असून हे पंचनामे करण्यासाठी ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

- Advertisement -

पंचनाम्यानंतर यादी प्रसिद्ध करणार

त्यामुळे पुढील दोन दिवसांत गावांत पोहचून पंचनामे करावे लागणार आहेत. आता दोन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत पंचनामे करावे लागणार आहेत. दरम्यान प्रशासनाच्यावतीने पंचनामे झालेल्या गावांतील शेतकर्‍यांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे ज्या शेतकर्‍यांचे पंचनामे झालेले नाहीत अशा शेतकर्‍यांना प्रशासनाला आपल्या पीक नुकसानीबाबत अवगत करून पंचनामे करून घेता येणार आहेत.

पावणेदोन लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

जिल्ह्यातील १८६५ गावांतील २ लाख ६ हजार ९२० शेतकर्‍यांचे १ लाख ७५ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यात १ लाख २४ हजार ८१२ हेक्टरवरील जिरायत, २४ हजार ३२७ हेक्टरवरील बागायत आणि ३१ हजार ८५८ हेक्टवरील बहुवार्षिक फळपिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -