घरUncategorizedदुष्काळाचे चटके सोसताना शिक्षणाबरोबर करिअरही ‘पाण्यात’

दुष्काळाचे चटके सोसताना शिक्षणाबरोबर करिअरही ‘पाण्यात’

Subscribe

हिंगणवाडीमधील जयंत बनसोडे यांची चित्तरकथा; मुलींच्या शिक्षणासाठी आता गाव बदलणार

वेळ दुपारी १ वाजेची… तापमानाचा पारा ४२ अंशाला टेकलेला.. तीन किलोमीटर अंतरावरून सायकलवर पाणी वाहणारा एक व्यक्ती… थकलेला, परिस्थितीने पुरता गांजलेला… पाणी वाहताना दमल्यावर त्याला आधार देणारी त्याची इवलीशी कन्या, भरउन्हात तिचा काय तो थोडाथोडका हातभार.. ‘याने चांगले शिक्षण घेतलं असतं तर अशी वेळ आली नसती’, अशी भावना या पाणी घेऊन येणार्‍या व्यक्तीकडे पाहून कुणाचीही होईल. पण ‘तुमचे शिक्षण किती आणि तुम्ही काय काम करतात’ असा प्रश्न त्यांना केला असता धक्कादायक उत्तर मिळाले.. या व्यक्तीचे शिक्षण होते एम. ए. (इंग्रजी) बी.एड. आणि व्यवसायाने शिक्षक!

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हा दुष्काळाने होरपळणारा तालुका. त्यात मनमाड शहराजवळील सर्वच खेड्यांचे पाण्याअभावी प्रचंड हाल आहेत. प्रत्येक गावात १५ ते २० दिवसांच्या अंतराने नळाला पाणी येते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी येथील अबलावृध्दांची पायपीट ही अव्याहतपणे चालूच असते. नांदगावपासून काही किलोमीटर अंतरावर हिंगणवाडी गाव. दुष्काळावर रडत बसण्यापेक्षा त्याचा सामना निडरपणे करण्याची गावकर्‍यांची मानसिकता. दुष्काळ दौरा करताना हिंगणवाडी गावाजवळ एक व्यक्ती सायकलवरून पाणी वाहताना दिसला. साधारणत: चाळीशीतला. दाढी थोडीफार वाढलेली. घामाघूम अवस्थेत तो सायकल ढकलत होता. भर उन्हात त्याला साथ द्यायला त्याची सहावीतील कन्याही होती. कडाक्याच्या उन्हामुळे सुनसान रस्त्यात हे दोघेच लांबवरून धापा टाकत येताना दिसले. अचानकपणे गाडी थांबलेली बघून सायकल ढकलणार्‍या व्यक्तीने प्रथमत: पाणी पिणार का, असा आस्थेवाईक प्रश्न केला. त्यानंतर सुरू झाला हृदयद्रावक संवाद. जयंत बनसोडे हे या व्यक्तीचे नाव. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करीत त्यांनी उच्चशिक्षण घेतले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मोठ-मोठी पुस्तके वाचली. इंग्रजीचा आदर्श शिक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न. पण वशिला नसल्यामुळे त्यांना चांगल्या शाळेत नोकरी मिळू शकली नाही. क्लासेस चालवून त्यांना कसेबसे पाच-सहा हजार रुपये महिन्याला मिळतात. त्यात पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांचा सांभाळ या तोकड्या उत्पन्नात करण्याची अवघड कसरत त्यांना करावी लागतेय.

- Advertisement -

याबद्दल बनसोडेंनी सांगितले की, ‘आमच्या गावासाठी दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असतो. आता दुष्काळाचे चटके लागत नाही. रक्तातच तो भीनला आहे. त्यामुळे आता परिस्थितीवर रडूदेखील येत नाही. रोज तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले जाते. दिवसातून दोन खेपा पाण्यासाठी मारल्या जातात. म्हणजेच रोज दहा ते बारा किलोमीटरवरून पाणी आणले जाते. पाणी भरत-भरतच दिवस निघून जातो. त्यामुळे करिअरचे भानही उरत नाही. पण असं करत-करत उमेदीचा काळ हातून निघून गेला. स्वत:च्या गावात राहण्याचा मोह आवरता आला नाही आणि आयुष्याची राखरांगोळी करून घेतली. पण, आता मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गाव बदलायचं आहे. माझी जी अवस्था झाली तशी मुलींची होऊ नये म्हणून आता गाव बदलायचं आहे…’, जयंत बनसोडे यांचे डोळे पाणावले होते. त्यांची चिमुरडी नॉमी मात्र बाबांना आधार देताना खूश दिसत होती. पाचवी उत्तीर्ण होऊन ती सहावीत गेलीय. पण भरपूर पाणी असेल अशा गावात रहायला जायचं असं तिचं मोजकं स्वप्न. बाबांना पाणी भरताना दमायला होतं, याची पुरेपूर जाणीव तिला आहे. म्हणूनच ती हट्ट करून बाबांबरोबर पाणी भरायला जातो. इवलीशी ताकद पणाला लावत सायकल ढकलत ती बाबांना आधार देण्याचं काम करतेय. नांदगाव तालुक्याच्या दौर्‍यात असे असंख्य जयंत बनसोडे भेटतात, जे केवळ आणि केवळ दुष्काळामुळे आपले स्वप्न पूर्ण करू शकलेले नाहीत. शासकीय व्यवस्थाही या मंडळींना नेहमीच वाकुल्या दाखविते. पाणीपुरवठा योजनांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मतांचं दान घेतलं जातं खरं; पण निवडणुका संपल्यानंतर टँकरची संख्याही कमी-कमी होऊ लागते. पाणीपुरवठ्याच्या योजना कागदावरच राहतात आणि मग सुरू होते जयंत बनसोडे यांची अखंड पायपीट.. हंडाभर पाण्यासाठी!

दुष्काळाचे चटके सोसताना शिक्षणाबरोबर करिअरही ‘पाण्यात’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -