घरमहाराष्ट्रअजितदादांना राग का आला?

अजितदादांना राग का आला?

Subscribe

सत्ता स्थापनेच्या चर्चेत पहिल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिनसलं आणि अजितदादा भडकले...

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची सुरुवात काँग्रेसने अगदी उशीरा म्हणजे कालपासून सुरु केली. त्याआधी राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत चर्चा करायला सुरुवात केली होती. काल काँग्रेसचे दिल्लीतील नेते आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत भेट झाल्यानंतर महाशिवआघाडी आकार घेईल, असे चिन्ह दिसत होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीने समान कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीची आज काँग्रेससोबत पहिलीच बैठक होणार होती. मात्र अजित पवारांनी सिल्वर ओकवरून बाहेर पडताना काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचे रागारागात सांगितले. मात्र अजित पवारांना राग का आला? याबद्दल आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्यामुळे अजित पवारांना राग आला का? अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यावे, असा फॉर्म्युला ठेवल्याची चर्चा होती. मात्र काल अहमद पटेल, वेणूगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पाच वर्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करेल, असे सांगितले होते. याचाच अर्थ पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहिला तरी काँग्रेसला काहीच अडचण नव्हती. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र चर्चा करुन फॉर्म्युला ठरविणार असे ठरले होते. मात्र त्याआधीच काँग्रेसने शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मिळाले तर अजित पवार हे निश्चितच त्याचे पहिले दावेदार ठरले असते. मात्र काँग्रेसने शिवसेनेशी मुख्यमंत्रीपदाची चर्चा केल्यामुळे राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी पडले. त्यामुळेच कदाचित अजित पवार यांनी रागारागात काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचे सांगत मी बारामतीला चाललो, असे सांगितले.

२००४ साली देखील अजितदादांची हुकली होती संधी

मुख्यमंत्री बनण्याची अजित पवार यांची इच्छा लपून राहिलेली नाही. २००४ साली राष्ट्रवादीच्या काँग्रेसपेक्षा अधिक जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणार, हे जगजाहीर असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद नाकारून काँग्रेसकडून अधिकची मंत्रीपदे पदरात पाडून घेतली होती. २००४ साली राष्ट्रवादीने निर्णय घेतला असता तर अजित पवार त्याचवेळी मुख्यमंत्री बनले असते. मात्र पवारांच्या निर्णयामुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले नव्हते. यावेळी देखील मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली असताना थोडक्यात ती हुकल्यामुळे अजित पवारांचा राग अनावर झाला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -