घरमुंबईभाजपनेही दिला तडका; म्हणे 'आम्ही वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत!

भाजपनेही दिला तडका; म्हणे ‘आम्ही वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत!

Subscribe

एकीकडे शिवसेनेला राज्यपालांनी दिलेल्या मुदतीमध्ये सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेलं संख्याबळ एकत्र करण्यात अपयश आलेलं असताना राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसंदर्भात विचारणा केली आहे. तर दुसरीकडे या सगळ्या गोंधळानंतर भाजपकडून संभ्रमावस्था निर्माण करणारी भूमिका घेतली गेली आहे. ‘आम्ही वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत’ असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, आता भाजप आणि शिवसेना अपयशी ठरल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मित्रपक्षाशी बोलणार असल्याचं राज्यपालांना सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उद्या संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंतची मुदत राज्यपालांनी दिली आहे.


हेही वाचा – राज्यपालांचं राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण!

शिवसेनेला राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेकडे वेळ होता. त्यासाठी शिवसेनेची नेतेमंडळी राजभवनावर गेली सुद्धा. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र मात्र त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे राज्यपालांकडे त्यांनी ३ दिवसांचा वेळ मिळावा, अशी विनंती केली. मात्र, त्यासाठी राज्यपालांनी मान्यता न दिल्यामुळे शिवसेनेला अपयश आल्याचं स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातला तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी आमंत्रण दिलं. आता मंगळवारी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंतची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल. ‘मित्रपक्षांशी बोलून आम्ही काय तो निर्णय घेऊ’, असं राज्यपालांना सांगितल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisement -

यादरम्यान, रविवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचा दावा करण्यात अपयश आलेल्या भाजपनं ‘आम्ही विरोधात बसू’, असं जाहीर केलं होतं. मात्र, आजच्या घडामोडींनंतर पुन्हा एकदा भाजपनं नवे फासे फेकत ‘आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत’, असं जाहीर केलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ‘या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन असून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत’, असं सांगितलं आहे. त्यामुळे भाजप अजूनही रेसमध्ये असल्याचेच सूतोवाच सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -