घरमहाराष्ट्रशरद पवारांना ईडीने नोटीस का बजावली? मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवारांना ईडीने नोटीस का बजावली? मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

Subscribe

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांनी नोटीस बजावली होती. या नोटीसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचे बोलले जात होते. या ईडी नोटीसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावली होती. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना ईडीकडून पवारांवर बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. ईडी नोटीसमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. दरम्यान, शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना ईडीकडून का नोटीस बजावण्यात आली? या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘न्यूज18लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागील कारण सांगितले आहे. ‘शरद पवार यांच्या निर्देशांनुसार राज्य सहकारी बँकेने काही लोकांना पात्रता नसताना कर्ज दिले’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कर्ज देण्यासाठी शरद पवारांनी पत्र पाठवले – मुख्यमंत्री

‘पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेने काही लोकांना कर्ज दिले. शरद पवार यांच्या निर्देशानुसार कर्ज देण्यात आल्याचा उल्लेख बँकेच्या ठरावात करण्यात आला आहे. काही पत्रे आहेत की ज्यामध्ये पवार साहेबांनी याला लोन द्या असे म्हटले आहे आणि त्याचा आधार त्यांनी घेतला आहे. तर याचा क्रिमिनल अँगल आहे की नाही, ते तपासातून समोर येईल. पवार साहेब असेही म्हणू शकतात की माझ्याकडे आला म्हणून पत्र दिले. पण त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्याठिकाणी नोंद करुन पवार साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही कर्ज देतोय म्हणत बेकायदेशीर कर्ज पास केले आहे. त्यामुळे अशा पत्रांची चौकशी सुरु आहे. त्याचा तपास ईडीकडून सुरु आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ईडी आणि शरद पवार!


काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिला होता. या अहवालानंतर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात शरद पवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या विरोधात आंदोलन पुकारले. त्यामुळे शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार जाण्याअगोदर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. अखेर ईडीने शरद पवार यांना ईमेल करुन सध्या आपल्या चौकशीची गरज नसून जेव्हा चौकशीला बोलवू तेव्हा या, असे सांगितले होते. त्यामुळे शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -