घोट्याळ्यात आता पवारांचे नाव कसे आले? एकनाथ खडसेंना शंका

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यावरुन शरद पवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे.

eknath khadse doubt about case filled against sharad pawar on maharashtra state cooperative bank scam
घोट्याळ्यात आता पवारांचे नाव कसे आले? एकनाथ खडसेंना शंका

‘मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. या गैरव्यवहारात सुरुवातीपासून कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते. त्यामुळे आता अचानक या प्रकरणात त्यांचे नाव कसे काय समारे आले?’, अशी शंका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. यावर राज्यभरातून प्रश्न उपस्थित होत असताना सत्तेतील भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले.


हेही वाचा – डॉ. अमोल कोल्हे रागात आणि भाजपचे वाघ जोशात


काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा अहवाल नाबार्डने दिला होता. या अहवालानंतर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता शरद पवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी ईडीच्या विरोधात आंदोलन पुकारले. आता यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार’, असे शरद पवार म्हणाले.