घरमहाराष्ट्रमतदान संपलं, महाराष्ट्रात ६०.०५% मतदान; आता नजरा २४ तारखेच्या मोजणीवर!

मतदान संपलं, महाराष्ट्रात ६०.०५% मतदान; आता नजरा २४ तारखेच्या मोजणीवर!

Subscribe

राज्यातल्या २८८ मतदारसंघांसाठी आज सकाळी ७ वाजता सुरू झालेलं मतदान संध्याकाळी बरोबर ६ वाजता संपलं. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार असून संध्याकाळी ५ ते ६च्या सुमारास सत्ता कुणाची येणार? याचं चित्र स्पष्ट होईल. राज्यभरात विविध भागात मतदानाचे वेगवेगळे ट्रेंड दिसले असले, तरी संपूर्ण राज्यातल्या सरासरी मतदानाची टक्केवारी मागील २०१४च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा घटली असल्याचं दिसून आलं आहे. आता ही मतं नक्की कुणाची कमी झाली? याचं उत्तर मात्र येत्या २४ तारखेलाच मिळू शकेल. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ६३.३८ टक्के मतदान झालं होतं. मात्र, यंदा हा आकडा कमी होऊन ६० टक्क्यांपर्यंतच अडकला आहे.

यंदा राज्यात २८८ मतदारसंघांपैकी २३४ खुल्या श्रेणीसाठी तर २९ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ होते. त्यामध्ये एकूण ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात होते. २०१४मध्ये हाच आकडा ४ हजार ११९ इतका होता. यावेळी महाराष्ट्रात एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्र होती. एकूण ३५२ मतदानकेंद्रांवर पूर्णपणे महिला कर्मचारी होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ६३.०८ टक्के होती. लोकसभा निवणुकीत ही आकडेवारी ६९.०७ टक्के होती. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये हीच आकडेवारी ६०.०५ टक्के इतकी राहिली आहे.

- Advertisement -

राज्यातल्या सर्व २८८ मतदारसंघातल्या मतांची टक्केवारी पाहिल्यास, ग्रामीण भागामध्ये मतदान वाढल्याचं प्राथमिक चित्र पाहायला मिळालं आहे. शहरी भागात मात्र हे मतदान कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या शेवटच्या दोन सभांचा परिणाम ग्रामीण मतदारांवर झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.


हेही वाचा – मतदानासाठी काहीपण! ट्रॅक्टरची ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात पूल

दरम्यान, आता मतांची टक्केवारी कमी का झाली? याविषयी खल सुरू झाला आहे. मतदानाच्या आधी देखील निवडणुकांसाठीची नेहमीची उत्सुकता दिसून येत नव्हती. सकाळी देखील १ वाजेपर्यंत फक्त ३० टक्के मतदान झालं होतं. ‘बदल घडणारच नसेल, तर मतदान करून काय उपयोग?’ अशा आशयाच्या काही प्रतिक्रिया मतदारांकडून येऊ लागल्या होत्या. त्यामुळे मतदान कमी होण्याचं हेच कारण असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. येत्या २४ तारखेला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या तासाभरात पोस्टल मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -