घरमहाराष्ट्रमाझं नाव घोटाळ्यात आल्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिला - शरद पवार

माझं नाव घोटाळ्यात आल्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिला – शरद पवार

Subscribe

अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. राजीनामा देण्यापुर्वी अजित पवार यांनी आपल्या कुटुंबीयांशी चर्चा केली होती. राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्या चिरंजिवाशी फोनवर बोलल्यानंतर राजीनाम्याचे कारण कळले असल्याचे पवार म्हणाले. “मी कोणत्याही पदावर नसताना माझ्यावर आरोप झाले असल्यामुळे अजित पवार व्यथित झाले होते. या उद्विगनेतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी अटकळ पवार यांनी बांधली. “मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. काही पटलं नाही तर त्याबाबत ठाम भूमिका घेण्यााचा अजित पवार यांचा स्वभाव आहे. त्यातूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा.” असे शरद पवार म्हणाले.

आमच्या कुटुंबीयांना धक्का बसेल अशी कोणतीही बातमी देऊ नका, अशी विनंतीही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या कुटुंबीयांशी चर्चा करताना अजित पवार यांनी सांगितले होते की, “सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. या संस्था संकटात आल्या तर शेतकरी वर्ग संकटात येतो. राज्य सहकारी बँकेने काही निर्णय घेतले होते. या निर्णयांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीबाबत अजित पवार यांना वैयक्तिक कोणतीही भीती वाटत नाही. मात्र माझे नाव या घोटाळ्यात घेतल्यामुळे ते व्यथित झाले होते. त्यामुळेच राजीनामा दिला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

- Advertisement -

राजकारण सोडून शेती-उद्योग करु – अजित पवार

आपल्या चिरंजीवाशी बोलताना अजित पवार म्हणाले की साहेबांनी इतके वर्ष लोकांसाठी काम करुनही जर त्याचे असे परिणाम पाहायला मिळत असतील तर यापुढे राजकारणात काम न केलेलेच बरे. राजकारणापेक्षा आपण शेती आणि उद्योगात लक्ष घालू, अशी भावना अजित पवार यांनी आपल्या चिरंजीवाजवळ व्यक्त केली असल्याचे पवार यांनी सांगितले.

आमच्यात मतभेद नाहीत – शरद पवार

अजित पवारांचा राजीनामा आणि पवार कुटुंबीय कलह याचा कोणताही संबंध नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमवरून माझी आणि अजित पवार यांची परस्पर विरोधी भूमिका होती. मात्र दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतात, ते नैसर्गिक असते, असे पवार म्हणाले. पवार कुटुंबीयात यत्किंचितही वाद नाहीत. आमच्या कुटुंबात कुटुंब प्रमुखाचा निर्णय अंतिम मानला जातो, त्याचा सन्मान इतर सदस्य राखतात. आधी माझ्या मोठ्या बंधुना तो मान होता. त्यांच्यानंतर माझ्या शब्दाचा कुटुंबात आदर केला जातो, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -