घरमहाराष्ट्र'कुस्ती पैलवानांशी होते इतरांशी नाही' पवारांच्या हातवाऱ्यांवर भाजपची टीका

‘कुस्ती पैलवानांशी होते इतरांशी नाही’ पवारांच्या हातवाऱ्यांवर भाजपची टीका

Subscribe

“आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवणाशी होते इतरांशी नाही.”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेपार्ह हातवारे केले आहेत. बार्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत पवार यांनी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रात निवडणुकीसाठी विरोधकच नाहीत. मग देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येत आहेत? मी ५० वर्षात काय केलं असा प्रश्न विचारण्याआधी तुमच्यापैकी ‘एक माय का लाल’ दाखवून द्या, जो सलग १४ वेळा निवणुक जिंकला असेल”, असे आव्हान देखील पवार यांनी भाजपला दिले.

शरद पवार यांनी हातवारे करुन केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी यावर नाराजी प्रकट करताना सांगितले की, “शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या तोंडी अशी भाषा किंवा हातवारे शोभत नाहीत.” देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतानाच शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले दिलीप सोपल यांच्यावरही टीका केली. बार्शीचा विकास करण्यासाठी पक्षांतर केले मग इतकी वर्ष काय करत होतात? असा प्रश्न विचारत असताना पवारांनी आक्षेपार्ह हातवारे केले. “काही लोक विकासाचे नाव सांगून आपल्याला सोडून गेले. बार्शीकर अशा पळकुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.”, असेही पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. कर्जमाफी दिली असती तर राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. मुख्यमंत्री शेतकरी समाजाला लहान पोरंटोरं समजू लागले आहेत. फक्त मोठा आकडा दाखवून शेतकरी समाजाला फसवण्याचे काम केले जात असल्याचेही पवार म्हणाले.

राज्य करणार की स्वयंपाक?

शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेचा समाचार देखील पवार यांनी घेतला. “दहा रुपयांत जेवण राज्यात कुठे आणि किती ठिकाणी देणार? तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय? अन्नधान्याचा प्रश्न आहे पण त्यासोबतच इतर प्रश्न देखील राज्यात आहेत.” अशी टीका पवारांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -