घरताज्या घडामोडीठरलं.. राष्ट्रवादीचे नाराज आमदार राजीनामाच देणार!

ठरलं.. राष्ट्रवादीचे नाराज आमदार राजीनामाच देणार!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रीपद नाकारल्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ आमदार नाराजीतून आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर जवळपास महिन्याभरानंतर महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ३६ मंत्र्यांनी सोमवारी राज्यपालांकडून मंत्रीपदाची शपथ घेतली. यात २५ कॅबिनेट मंत्री तर १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, नेहमीप्रमाणे ज्यांना मंत्रीपदं मिळाली, ते खूश तर ज्यांना डावललं गेलं, ते नाराज असल्याचं चित्र या शपथविधीनंतर पाहायला मिळत आहे. यामध्ये जसे शिवसेनेतले काही ज्येष्ठ आमदार आहेत, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले देखील आहेत. त्यामुळे मंत्रीपद नाकारले गेलेले आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर त्यातलं पहिलं नाव आता समोर आलं असून बीड जिल्ह्याच्या माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.

‘नाराजी नाही, कंटाळा आलाय!’

प्रकाश सोळंके हे चौथ्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले आहेत. तसेच, माजी उपमुख्यंमत्री सुंदरराव सोळंके यांचे ते पुत्र आहेत. बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आणि आमदार असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना नाकारून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलं. यामुळे सोळंके नाराज असल्याचं बोललं जात होतं. अखेर, आज त्यांनी राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीनुसार, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचं कर्तृत्व जास्त आहे. त्यांचं नेतृत्व पक्षाला मोठं वाटलं असेल’, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मनातली नाराजी स्पष्टपणे जाणवत आहे. मात्र, नाराज असल्याचा त्यांनी नकार दिला आहे. ‘मी पक्षावर नाराज नाही. कंटाळा आल्यामुळेच राजीनामा देत आहे. त्यामुळे माझ्या नाराजीचा संबंध मंत्रीमंडळ विस्ताराशी जोडू नये. मी राजीनामा देऊन पक्षाचं काम करणार आहे. राजकीय सन्यास घेणार आहे. राजकारणाची किळस आली आहे मला’, असं ते म्हणाले आहेत. मात्र, नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, यासंदर्भात अजित पवारांनी सांगितलं की, ‘मंत्रिपद वाटपानंतर काही प्रमाणात नाराजी असतेच. त्यासंदर्भात थेट सोळंकेंशी माझं बोलणं झालेलं नाही. त्यांच्या भावाशी मी बोललो आहे. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’

- Advertisement -

सुनील राऊतही राजीनामा देणार?

दरम्यान, सोळंके यांच्याप्रमाणेच शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत हे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत यांनी महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे खुद्द संजय राऊत देखील नाराज असून त्यामुळेच ते सोमवारच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते, असं बोललं जात आहे. त्याशिवाय, सुनील राऊत देखील नाराज असून आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


हेही वाचा – शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवर खासदार संजय राऊतांचा खुलासा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -