घरमुंबईआई-वडिलांच्या प्रचाराची जबाबदारी मुलांच्या खांद्यावर

आई-वडिलांच्या प्रचाराची जबाबदारी मुलांच्या खांद्यावर

Subscribe

९ उमेदवारांची मुले प्रत्यक्ष प्रचारात अग्रेसर

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येवू पोहोचला आहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार पक्षाच्या तसेच मित्र आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांसह विभागात फिरुन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मुंबईतील ९ ते १० उमेदवारांच्या प्रचाराची मुख्य जबाबदारीच आता त्यांच्या मुलांनी झेलली आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या प्रचारात त्यांची मुले मोठ्या जबाबदारीने प्रचार करताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत माहिम-दादरमधील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान, भायखळ्यातील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचे पुत्र निखिल, दिंडोशीतील महायुतीचे उमेदवार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकीत, विलेपार्ला येथील आघाडीचे उमेदवार अशोक जाधव यांची कन्या अल्फा, वर्सोव्यातील अपक्ष उमेदवार राजुल पटेल यांची कन्या जिनल पटेल मालाडमधील महायुतीचे उमेदवार रमेशसिंह ठाकूर यांचे पुत्र सागरसिंह,चेंबूरमधील महायुतीचे उमेदवार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या सुप्रभा, वडाळ्याचे महायुतीचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांचे पुत्र प्रथमेश, गोरेगावमधील महायुतीचे उमेदवार विद्या ठाकूर यांचे पुत्र दिपक आदी ९ ते १० उमेदवारांची मुले आई व वडिलांच्या प्रत्यक्ष निवडणुकीत प्रचारात सहभागी होवून याची जबाबदारी उचलताना दिसत आहे.

- Advertisement -

भायखळ्यातील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचे पुत्र निखिल हे युवासेनेचे पदाधिकारी असून सिनेटचे सदस्य आहेत. मात्र, पायाला अपघात झाल्याने ते सध्या घरीच आहेत. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे यांच्या प्रचारात त्यांना सहभागी होता येत नाही. परंतु पायाला दुखापत झाल्याने कार्यालयात बसून आईच्या प्रचाराची सर्व रणनिती ठरवत आहेत. निखिलला वरळीत आदित्य ठाकरेंच्या प्रचारात सहभागी व्हायची इच्छा असली तरी पायाच्या दुखापतीमुळे तिथे जाता येत नाही. पण आईच्याही प्रचारात फिरता येत नाही. त्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया राबवण्याची महत्वाची जबाबदारी निखिलने आपल्या खांद्यावर घेतली आहे.

तर दादरमधील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान हे नगरसेवक आहेत. परंतु, यावेळी वडिलांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. कार्यकर्त्यांपासून पदाधिकार्‍यांच्या बैठका, साहित्य वाटप यांमध्ये समाधानच महत्वाची जबाबदारी पार पडत असल्याने सदा सरवणकर हे प्रचार करण्यास मोकळेपणाने फिरत आहेत. विधीमंडळाचे प्रतोद असलेले दिंडोशीचे महायुतीचे उमेदवार सुनील प्रभू यांच्या प्रचाराची रणनिती स्वत: आखत असले तरी प्रचाराच्या दुसर्‍या रणनितीचा भार त्यांचे पुत्र अंकित यांच्या खांद्यावर आहे. अंकित वडिलांसह प्रचारात सहभागी न होता, स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसत आहे.

- Advertisement -

वर्सोव्यातील बंडखोर उमेदवार राजुल पटेल यांची कन्या जिनल पटेल या शिक्षिका आहेत. पण सध्या त्यांनी पूर्णपणे आईच्या प्रचाराकडेच लक्ष दिले आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे हाती कटआऊट घेत जिनल या राजुल पटेल यांचा प्रचारात महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहेत.

उमेदवार आणि प्रचारातील सहभागी झालेली मुले
भायखळा: शिवसेना-यामिनी जाधव( निखिल जाधव ,युवासेना पदाधिकारी,सिनेम सदस्य)
दादर-माहिम :शिवसेना -सदा सरवणकर(समाधान सरवणक,नगरसेवक)
दिंडोशी : शिवसेना सुनील प्रभू (अंकित प्रभू,युवा सेना पदाधिकारी)
गोरेगाव-भाजप-विद्या ठाकूर(दिपक ठाकूर, भाजप नगरसेवक)
वडाळा :भाजप- कालिदास कोळंबकर(प्रथमेश कोळंबकर,समाजसेवक)
वर्सोवा : बंडखोर-राजुल पटेल-(जिनल पटेल, शिक्षिका)
मालाड पश्चिम: रमेशसिंह ठाकूर-(सागरसिंह ठाकूर,नगरसेवक)
अंधेरी पश्चिम: अशोक जाधव-(अल्फा जाधव,नगरसेविका)
चेंबूर-प्रकाश फातर्पेकर-(सुप्रभा,युवा सेना पदाधिकारी,माजी नगरसेविका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -