घरमुंबईम्हणून शरद पवार - उद्धव ठाकरे भेट झाली ताज हॉटेलवर!

म्हणून शरद पवार – उद्धव ठाकरे भेट झाली ताज हॉटेलवर!

Subscribe

राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच शिवसेनेला छुपा पाठिंबा दिला होता. मात्र त्यासाठी सेनेने केंद्रातील मंत्रीपद सोडावे, अशी अट घातली होती. अरविंद सावंत हे दिल्लीत पत्रकार परिषदेत राजीनामा दाखवत असताना इथे मुंबईत पवार-ठाकरे भेट घडली. मात्र पवारांनी या भेटीत उद्धव ठाकरे यांचा मान राखल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकला (पवारांचे निवासस्थान) येण्यास तयार होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी पवारांच्या घराचे उंबरे झिजवले हे चित्र निर्माण होऊ नये यासाठी पवारांनी त्रयस्थ ठिकाणी भेटणे पसंत केले.

शिवसेनेत मातोश्री निवासस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीची बातचीत किंवा जागावाटपाच्या फॉर्म्युलाची चर्चा करण्यासाठी भाजपला मातोश्रीवर येण्यास सांगतात. त्यामध्ये मातोश्री वरचढ असल्याची एक भावना प्रस्थापित होते. मात्र शरद पवार यांनी हा मोह कटाक्षाने टाळलेला दिसतो. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे पवारांसोबतचे मधुर संबंध सर्वांना परिचित आहेतच. राऊत हे पवारांच्या दिल्लीतील किंवा मुंबईतील निवासस्थानी सतत ये-जा करत असतात. मात्र ठाकरेंच्या बाबतीत पवारांनी वेगळाच निर्णय घेतला.

- Advertisement -

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक सुरु होती. या बैठकीनंतर पवार सुप्रिया सुळे, अजित पवार यांना घेऊन निघाले. त्यावेळी खुद्द अजित पवारांनाही आपण कुठे चाललो आहोत, याची कल्पना नव्हती. असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सिल्वर ओक यांच्यातील अंतर कमी आहे. मात्र तरिही पवार-ठाकरे यांनी सिल्वर ओक किंवा मातोश्रीचा पर्याय टाळला. शिवसेना – राष्ट्रवादीमध्ये मॅच फिक्स होती, असा गैरसमज पसरू नये, यासाठीही ही भेट तिसर्‍याच ठिकाणी घेण्यात आली, असेही सांगितले जात आहे.


हेही वाचा – भाजपनेही दिला तडका; म्हणे ‘आम्ही वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत!

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट सिल्वर ओकला घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याच राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेकडून फारकत घेतली होती, तेव्हा सुद्धा पवारांनी राज ठाकरे यांना सिल्वर ओकला न भेटता बाहेरच भेटणं पसंत केले होते. त्याप्रमाणे आजही सिल्वर ओक जवळच असूनही पवारांनी बांद्रा येथील ताज लँड्स एंड येथील हॉटेलमध्ये जाऊन ठाकरेंची भेट घेतली. कदाचित माध्यमांचे प्रतिनिधी सिल्वर ओक, मातोश्री आणि बांद्र्यातील रंगशारदा येथे येऊन गर्दी करु नयेत, यासाठीही ही भेट भलत्याच ठिकाणी झाली असावी, असाही कयास बांधला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -