घरमुंबईसंजय राऊत शिवसेनेचे पोपट, उद्धव ठाकरेंनी थेट बोलावे - रवी राणा

संजय राऊत शिवसेनेचे पोपट, उद्धव ठाकरेंनी थेट बोलावे – रवी राणा

Subscribe

शिवसेनेकडे १७५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांना राऊत यांच्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, 'संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत. मला असे वाटते उद्धव ठाकरेंनी थेट बोलायला पाहिजे', असे उत्तर दिले.

शिवसनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत गेल्या आठवड्यापासून प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेना सध्या मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. याशिवाय त्यांनी सत्तास्थापनेचा दावा देखील केला आहे. शिवसेनेकडे १७५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांना संजय राऊत यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, ‘संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत. मला असे वाटते उद्धव ठाकरेंनी थेट बोलायला पाहिजे’, असे ते म्हणाले. राज्यात सध्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली.


हेही वाचा – ‘तरुण भारत’मधून शिवसेनेवर टीका; राऊत यांचे खिल्ली उडवत प्रत्युत्तर

- Advertisement -

 

‘उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर अंकुश ठेवावा’

‘संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत. मला असे वाटते उद्धव ठाकरेंनी थेट बोलायला पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यात निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा झाली. लोकांनी शिवसेनेला नाही तर युतीला मते दिली आहेत. त्यामुळे संजय राऊत कितीही बोलले तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. संजय राऊत यांच्यामार्फत उद्धव ठाकरे जर जनतेचा छळ करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये जनता शिवसेनेला जरुर सबक शिकवणार आहे’ असे रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मोठ्यांच्या वादात लहानांनी तोंड खुपसू नये – उदय सामंत


 

…तर शिवसेनेचे १५ ते २० आमदार फुटतील – रवी राणा

‘ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्यातील जनतेसाठी कामे केली ते पाहिल्यानंतर राज्याचे पुढच्या पाच वर्षांचे मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस यांनीच व्हावे, अशी माझी इच्छा आहे. २० ते २५ अपक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिमागे उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेची जी मुजोरी चालली आहे ती मुजोरी आता खरच थांबली पाहिजे. कारण आज शिवसेना युतीचा एक घटकपक्ष म्हणून निवडून आलेला पक्ष आहे. आज शिवसेनेला जितक्या जागांवर यश मिळाले आहे त्याचे पूर्ण श्रेय भाजपला जाते. शिवसेना जर युतीमध्ये नसती तर २५ पेक्षाही कमी जागा शिवसेनेच्या आल्या असत्या. म्हणून शिवसेना अरेरावी करुन महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करत आहे. याशिवाय मला असे वाटते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिवसेना त्यामध्ये नसेल तर येत्या १५ दिवसांत शिवसेनेचे १५ ते २० आमदार फुटतील. हे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या सध्या संपर्कात आहेत. ते माझ्याही संपर्कात आहेत. परंतु, मला असे वाटते शिवसेनेने ती परिस्थिती आणू नये’, असे रवी राणा म्हणाले.


हेही वाचा – सत्ता स्थापनेवर मी प्रतिक्रिया देणार नाही – देवेंद्र फडणवीस


 

संपर्कात असणारे २० ते २५ आमदार कोण?

भाजप आणि रवी राणा यांच्या संपर्कात असलेले शिवसेनेचे २० ते २५ आमदार कोण आहेत? असा प्रश्न विचारला असता ‘जे लोक शिवसेनेपासून त्रस्त झाले आहेत. निवडणुकीत जे महायुतीमुळे निवडून आले आहेत. ते हे २० ते २५ आमदार आहेत. याशिवाय गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कामे पाहिली आहेत. ते शिवसेनेवर नाराज आहेत.’, असे ते म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -