घरमहाराष्ट्रआज शरद पवार-सोनिया गांधी भेट; पाठिंब्यावर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद!

आज शरद पवार-सोनिया गांधी भेट; पाठिंब्यावर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद!

Subscribe

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी दिल्लीमध्ये भेटणार आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून वेगवेगळे अंतर्गत मतप्रवाह दिसत असून त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेणं दोघांसाठी देखील कठीण जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता जवळपास महिना होत आला असून अजूनदेखील सत्तास्थापनेची कोणतीही चिन्ह दृष्टीपथात दिसत नाहीयेत. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सोयरीक करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीमध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी चर्चा होणार असून त्यानुसार राज्यातल्या सत्तास्थापनेची सूत्र हलणार आहेत. मात्र, असं असलं, तरी दोन्ही पक्षांमध्ये शिवसेनेला द्यायच्या पाठिंब्यावरून अंतर्गत मतप्रवाह दिसू लागले आहेत. त्यामुळे या भेटीतून तोडगा निघण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत.

ड्राफ्टवर चर्चा होणार?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या संयुक्त समन्वय समिती बैठकीमध्ये आगामी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अर्थात जागावाटप कशा पद्धतीने असावं, यासंदर्भातला एक ड्राफ्ट शुक्रवारी तयार करण्यात आला. आता हा ड्राफ्ट तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

काँग्रेस-राष्ट्रवादीत पक्षांतर्गत मतप्रवाह

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष जरी पाठिंब्यावर चर्चा करण्यासाठी आज भेटत असले, तरी दोन्ही पक्षांमध्ये यावरून वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट अजूनही भाजपसोबत जाण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये अजूनही शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी एकमत झाल्याचं स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा होतेय, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहे.


हेही वाचा – ‘…तर शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, भाजप मंत्र्याचा गंभीर इशारा!

अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकांवर

दरम्यान, शिवसेना अधिकृतरित्या एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा रविवारी दिल्लीमध्ये भाजपने केली. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेचे १६ खासदार विरोधी बाकांवर बसणार आहेत. मात्र, असं असलं, तरी अशा प्रकारे शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याचा निषेध शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -