घरमहाराष्ट्रशरद पवारांचा मास्टर स्ट्रोक आणि विरोधकांना संजीवनी!

शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक आणि विरोधकांना संजीवनी!

Subscribe

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही ईडी चौकशी होणार, या बातमीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला मोठा फायदा होईल, असे मांडे सत्ताधारी खात असताना पवारांनी आपणच शुक्रवारी 27 सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जाऊ आणि त्यांचा पाहुणचार घेऊ, असे जाहीर करत मास्टर स्ट्रोक मारला आहे. प्रतिस्पर्धी अंगावर येत आहेत, हे समजताच गर्भगळीत न होता दुप्पट वेगाने त्यांना सामोरे जात विरोधक अजून संपलेले नाहीत, हेच पवारांनी दाखवून दिले. आपल्या सर्वात बुजुर्ग नेत्यांच्या या पवित्र्याने राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, मनसे आणि विरोधी पक्षांना संजीवनी मिळाली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बैल गाडीभर पुरावे देत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटवले होते. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या 72 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र गेली पाच वर्षे या आरोपाचे भिजत घोंगडे कोर्टात पडले आहे. भाजपची सत्ता येताच अजितदादा आणि तटकरे यांना तुरुंगात जातील, असे भाजपचे नेते उघडपणे सांगत फिरत होते. मात्र आता 2019 ची निवडणूक आली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन नेते तुरुंगात काही गेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपच्या हाती विरोधकांच्या भ्रष्टाचाराविषयी सांगण्यासारखे काहीच उरले नव्हते. याचवेळी शिखर बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 संचालकांवर ईडीने गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचा फायदा सत्ताधारी घेण्याआधी शरद पवारांनी स्वतः. ईडीच्या चौकशीला जाणार असल्याचे सांगत भाजपच्या आक्रमणातील हवा काढून घेतली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांना टार्गेट करत विरोधकांच्या मुख्य चेहर्‍यावर शरसंधान करत लोकांमध्ये सत्ताधार्‍यांविषयी जनमत तयार केले होते. त्याचा त्यांना फायदाही झाला आणि आताही तेच डावपेच भाजपकडून खेळले जात आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करतानाही मोदी यांनी पवार यांना लक्ष्य केले होते. पवारांच्या पाकिस्तान प्रेमाचा उल्लेख करत विरोधकांना जर्जर करण्याचा यामागे हेतू होता आणि आता शिखर बँकेच्या घोटाळ्यात पवारांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत, हे दाखवून तोच पाच वर्षांपूर्वीचा खेळ खेळायला सुरुवात झाली आहे.

पाच दशकांहून अधिक काळाच्या राजकारणात पवारांवर आरोप झाले. पण त्यांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले आहेत, असे कधीच झाले नाही. मात्र गेल्या पाच वर्षांपासून भाजपकडून पवार यांना ठरवून टार्गेट केले जात आहे. पवार घराणे, बारामतीशिवाय महाराष्ट्राचा कुठे विकास झाला ते सहकाराच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे घोटाळे केले, हे दाखवण्यात आले. हा डाव यशस्वी होत आहे, हे लक्षात येताच आता पुन्हा शिखर बँक घोटाळ्यानिमित्त पवारांचे नाव समोर आले आहे.

- Advertisement -

पवारांना यांची आता सवय झाल्याने त्यांनी थेट ईडीला आपणहून सामोरे जाण्याचे ठरवले आहे. खरेतर पवार यांना ईडीने आपणहून चौकशीसाठी बोलावलेले नाही. पण, त्याच्या बोलवण्याची वाट न पाहता पवार शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जातील. यामुळे विरोधकांना बळ तर मिळेलच; पण भाजप ईडीमागून पवार यांना अडकवू पाहत आहेत, हे पाहून विरोधकांच्या कार्यकर्त्यांना मोठे बळ येऊन ते रस्त्यावर उतरतील आणि हेच चित्र निवडणुकीपर्यंत कायम राहील, असे वातावरण निर्माण करण्यात पवार यशस्वी ठरले आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यानंतर राज यांच्यासारखा मुलुख मैदान असलेला नेता गेले काही दिवस चिडीचूप झाला आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांच्या आक्रमक प्रचारामुळे मोदी यांच्याविरोधात एकच खळबळ उडवली होती. देशभर राज यांच्या भाषणांची मोठी चर्चा झाली. मात्र, त्यांच्या ईडी चौकशीमुळे पुन्हा ते नव्या दमाने भाजपचा समाचार घेतील की नाही असे वाटत आहे. हे कमी म्हणून की काय पवार यांना ईडीची भीती दाखवून विरोधकांच्या आव्हानातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आपणच चौकशीला तयार असल्याचे दाखवत पवारांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -