घरमहाराष्ट्र'शिवसेना काँग्रेससोबत गेली म्हणून मी राजीनामा देतोय'; सेना पदाधिकाऱ्याची खंत!

‘शिवसेना काँग्रेससोबत गेली म्हणून मी राजीनामा देतोय’; सेना पदाधिकाऱ्याची खंत!

Subscribe

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे नाराज झालेल्या एका शिवसेना पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करून आता ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. पण असं होत असताना सामान्य शिवसेना कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र काहीशी नाराजी दिसून येत आहे. एका शिवसेना पदाधिकाऱ्याने अशाच नाराजीतून चक्क शिवसेना पक्षाचाच राजीनामा दिला आहे. ‘शिवसेनेचा राजीनामा देणं हा माझ्यासाठी भयंकर त्रासदायक निर्णय आहे. मात्र, माझी विचारसरणी आणि मूल्य मला काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. मी मनात नसताना काम करू शकत नाही. आणि ते माझ्या पदासाठी चुकीचं ठरेल’, असं या पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे. रमेश सोलंकी असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून ते युवासेनेत कार्यरत होते.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या शपथविधीची तारीख बदलली!

‘सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला शुभेच्छाच’

रमेश सोलंकी यांनी मंगळवारी संध्याकाळी यासंदर्भात ट्वीट केले आहेत. यामध्ये त्यांनी त्यांचा सुरुवातीपासूनचा शिवसेनेसोबतचा प्रवास सांगितला आहे. ‘१२ वर्षांचा असल्यापासून मी शिवसेनेसोबत आहे. गेल्या २१ वर्षांपासून कोणत्याही पदाच्या अपेक्षेशिवाय पक्षाचं काम केलं आहे. पण आता शिवसेनेने राजकीय निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माझ्या शिवसेनेला आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाच आहेत. पण मला जड अंत:करणाने शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे’, असं रमेशने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

उद्या होणार उद्धव ठाकरेंचा शपथविधी

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्क येथे शपथविधी होणार आहे. यावेळी महाविकासआघाडीच्या सरकारमधली काही मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. या शपथविधीचं निमंत्रण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात येणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -