घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंच्या विजयासाठी टीम आदित्य रिंगणात

आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी टीम आदित्य रिंगणात

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठाकरे घराण्यातील युवा नेता आदित्य ठाकरे प्रथमच यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आदित्यला निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी आदित्यने 2010 पासूनच सुरू केली आहे. त्यासाठी विशेष टीम सज्ज आहे. टीममध्ये आदित्यचा मावस भाऊ वरूण सरदेसाई, युवासेनेचे जनरल सेक्रेटरी अमोल कीर्तिकर, शिवसेना सेक्रेटरी सुरज चव्हाण, शिवसेना प्रवक्ता हर्षल प्रधान, युवासेना कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे व मुंबई विद्यापीठातील मॅनेजमेंट काऊन्सिल सदस्य प्रदीप सावंत यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.

आदित्य ठाकरेंचे शिष्टमंडळ

वरूण सरदेसाई
आदित्यचा मावस भाऊ असलेल्या वरूणकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियर व कोलंबिया विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्सची पदवी त्याने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून वरूणकडे शिवसेनेच्या आयटी सेलची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

- Advertisement -

सूरज चव्हाण

बीई शिक्षण घेतलेला सुरज 2018 पासून शिवसेनेच्या सचिवपदी कार्यरत आहे. आदित्यच्या भेटीगाठी आणि राजकीय कार्यक्रम ठरवण्याची जबाबदारी सुरजवर आहे. आदित्यला भेटायला येणार्‍या प्रत्येकाला प्रथम सुरजशी बोलणी करावी लागते.

- Advertisement -

हर्षल प्रधान
आदित्यच्या प्रत्येक कार्यक्रमाची व्यवस्थित प्रसिद्धी, प्रसारमाध्यमांशी संबंधित विषयाचे समन्वय, त्याचबरोबर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य यांच्या मोर्चे व रॅलीजचे नियोजन करण्याची जबाबदारी हर्षल प्रधान यांच्यावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेची होत असलेली प्रसिद्धी, मुलाखती हा त्याचाच एक भाग आहे.

अमोल कीर्तिकर

शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांचा पुत्र. जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेल्या अमोल यांचे पद हे युवासेनेमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे आहे. युवासेनेच्या कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय, अमलबजावणी यामध्ये त्याचा समावेश असतो. तसेच ग्रामीण भागामध्ये आदित्य ठाकरेच्या रॅली, प्रसिद्धीची जबाबदारी अमोलवर आहे.

साईनाथ दुर्गे
युवासेनेचा कार्यकारी सदस्य व मुंबई महापालिकेत शिक्षण समिती सदस्य आहे. शालेय शिक्षणामधील प्रश्न हाताळण्याची जबाबदारी दुर्गे यांच्याकडे आहे. शिक्षण क्षेत्रावर असल्याने शालेय शिक्षणातील प्रत्येक प्रश्नाची माहिती आदित्यला पुरवणे व आदित्यच्या मार्गदर्शनानुसार शिक्षणासंदर्भातील मुद्दे उपस्थित करण्याची जबाबदारी साईनाथवर आहे.

प्रदीप सावंत
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या मॅनेजमेंट काऊन्सिलचे सदस्य, उच्च शिक्षणातील विविध महत्त्वाच्या पैलूवर मुंबई विद्यापीठात काम करणे. शिक्षण हा आदित्यच्या जवळच्या विषय असल्याने मुंबई विद्यापीठाच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्रदीप सावंत यांच्याकडून आदित्यला दिली जाते. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीत प्रदीप सावंतची भूमिका महत्त्वाची होती.

आदित्य ठाकरेने आर्ट्स व लॉ शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घोंगावत असलेले राज नावाच्या वादळाकडे आकर्षित होणार्‍या तरुणांना रोखण्यासाठी आदित्यचा राजकीय पटलावर उदय झाला. त्यामुळे वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये त्याने शिवसेनेच्या युवासेनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. कॅनेडाच्या रोहिंग्टन मिस्त्री या लेखकाने त्याच्या ‘सच अ लाँग जर्नी’ पुस्तकात मुंबईतील डबेवाल्यांबद्दल अपशब्द वापरले होते आणि तेच पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होते. याविरोधात जोरदार आंदोलन करून त्यांनी आपली दखल घेण्यास सर्वांनाच भाग पाडले.

आदित्य ठाकरेने शिक्षण, मनोरंजन व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मुद्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोस्टल रोड आणि आरे प्रकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे अधिकच आक्रमकपणे नागरिकांसमोर आला. त्याचप्रमाणे आदित्यने क्रीडा क्षेत्रातही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ठाकरे कुटुंबाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वर्चस्व असलेल्या मुंबईतील 34 क्रिकेट क्लबवर त्याने नियंत्रण मिळवले तसेच 2017 मध्ये त्यांची मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -