काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर जागा राखण्याचे आव्हान

आघाडीतील बिनीचे शिलेदार गळाला लावत आणखी जागा जिंकण्याचे संकेत

नाशिक विभागातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये सलग दोन वेळा सर्वच्या सर्व जागा जिंकणार्‍या भाजप-शिवसेना युतीने मागील विधानसभा निवडणुकीत ४८ जागांपैकी २८ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी आघाडीतील दोन्ही पक्षांचे बिनीचे शिलेदार गळाला लावत यावेळी ही संख्या आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे नाशिकसह पाचही जिल्ह्यांतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांसमोर स्वत:ची जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे.

विभागात नाशिकमधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, धुळ्यातून काँग्रेसचे रोहिदास पाटील, जळगावमधून गुलाबराव देवकर, नंदुरबारमधून माणिकराव गावित व नगरमधून बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, मधुकरराव पिचड अशा दिग्गज नेत्यांची फौज आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक शैलीच्या राजकारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक गड उद्ध्वस्त होऊन अनेकांनी शिवसेना-भाजपची वाट धरली आहे. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील, मधुकरराव पिचड, माणिकराव गावितांचे पुत्र भरत गावित, भाऊसाहेब कांबळे निर्मला गावित आदींचा समावेश आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याही पक्षांतराच्या मध्यंतरी चर्चा होत्या. याशिवाय आणखी काही आमदार युतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांमुळे प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत आघाडीचे किती आमदार टिकून राहतील, याबाबत आघाडीच्याच कार्यकर्त्यांना शंका असल्याची स्थिती आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघही उत्तर महाराष्ट्रात येतो. त्यांच्या मतदारसंघालगतचे अकोले, राहुरी हे मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपवासी झाल्याने त्यांच्या माध्यमातून थोरात यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. या सर्व बाबींचा विचार करता उत्तर महाराष्ट्रात युतीने २८ पेक्षा अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे.

युतीत जागा अदलाबदल शक्य
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले. उत्तर महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांपैकी भाजपचे २० व शिवसेनेने ८ जागांवर विजय मिळवला होता. त्यात परस्परांमधील प्रमुख लढती वगळता इतर ठिकाणी शिवसेना ९ मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकावर होती, तर भाजप सहा ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावर होता. यामुळे या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाट्याला १७, तर भाजपच्या वाट्याला ३१ मतदारसंघ येतील, असा अंंदाज आहे. त्यात अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच श्रीरामपूरमधील भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या दोन्ही ठिकाणी भाजप-शिवसेनेत आदलाबदल होण्याची शक्यता आहे.