घरमहाराष्ट्रनाशिक...म्हणून बावनकुळेंना भाजपने नाकारले

…म्हणून बावनकुळेंना भाजपने नाकारले

Subscribe

मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींची साथ असतानाही ठेवले बाजूला, उमेदवारी नाकारण्यामागील कारणांवर राजकीय खल

भाजपने केलेल्या सर्व्हेक्षणात टॉप, ग्राउण्ड लेव्हलवर केलेले भरीव काम आणि मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींनी शब्द टाकूनदेखील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा खल अद्याप कायम आहे. मात्र, राज्यातील एका ऊर्जानिर्मिती प्रकल्पावर केंद्रीत केलेले लक्ष आणि त्यामुळे दिल्लीकर भाजपनेत्यांची ओढवून घेतलेली नाराजीच बावनकुळेंना भोवल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते आहे.

नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांना पुन्हा एकदा हमखास तिकिट मिळणार अशी सर्वांनाच खात्री होती. भाजपने त्यांच्या उमेदवारीचा निर्णय अखेरपर्यंत ताणून धरत अखेर तिकीट कापले. बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी दोन अर्ज भरले होते. मात्र, भाजपने टेकचंद सावरकर यांना उमेदवारी बहाल करत बावनकुळेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

- Advertisement -

नाशिकमध्ये मात्र फुटले फटाके

ऊर्जामंत्री बावनकुळे यांची उमेदवारी डावलण्यात आल्याचे स्पष्ट होताच नाशिकमधील एकलहरे येथे फटाके फोडून स्थानिकांनी जल्लोष केला. एकलहरे येथील औष्णिक विद्युत प्रकल्पात ६६० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प गेल्या १० वर्षांपासून बासनात असताना, ऊर्जामंत्र्यांनी त्याकडे डोळेझाक करत आपल्या मतदारसंघात ६६० मेगावॅट क्षमतेच्या आणखी दोन संचांना मंजुरी दिली. त्यामुळे एकलहरेतील प्रकल्पावर अवलंबून असलेल्या स्थानिकांनी बावनकुळेंची उमेदवारी नाकारल्याचे समजताच फटाके फोडून जल्लोष केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -